मुंबई - ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचे आज निधन झाले. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेले, लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्र विरोधी शांतता चळवळीत काम करणारे हेमू अधिकारी हे त्यांच्या रंगकर्मी-सिनेअभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जातात. ४५ नाटकं, १६ मराठी व हिंदी चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. अधिकारी यांचे ‘नाट्य विज्ञान समाजेन’ हे पुस्तक नुकतेच सृजन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. हेमू अधिकारी यांच्यावर रात्री १० वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी अजित भुरे, प्रसाद कांबळी, आनंद इंगळे, विद्याधर जोशी आणि संतोष काणेकर उपस्थित होते.
हेमू अधिकारी हे अतिशय अस्वस्थ, बुद्धिप्रामाण्यवादासाठी तगमगणारा आणि सदैव प्रायोगिक रंगभूमीच्या बाजूने उभे राहिलेले निष्ठावान रंगकर्मी होते. ते प्रागतिक साहित्य- नाट्य चलवळीचा पाठिराखे होते. नम्र पण आग्रही,कृतीशील असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. जुलूस, पगला घोडा या नाटकातल्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. एका ज्येष्ठ मित्राचं जाणं चुटपुट लावणारं आहे. हेमूना अखेरचा सलाम.
- जयंत पवार, नाटककार