पुणे : मराठी आणि संस्कृत संगीतनाट्य रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका सुमती टिकेकर (७९) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती बाळासाहेब टिकेकर, मुलगी गायिका उषा देशपांडे, मुलगा अभिनेते उदय टिकेकर आणि स्नुषा आरती अंकलीकर-टिकेकर आणि नात आनंदी टिकेकर असा परिवार आहे. टिकेकर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभुमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमती टिकेकर यांनी आपल्या स्वरांनी संगीत नाटकांना एक वेगळी उंची मिळवून दिली होती. त्या जयपूर घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. नाट्यसंगीतातील योगदानाबद्दल त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. ‘संगीत वरदान’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ यांसह अनेक गाजलेल्या संगीत नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. ‘आठवणी दाटतात’ हे त्यांचे नाट्यगीत विशेष गाजले. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ अभिनेत्री सुमती टिकेकर यांचे निधन
By admin | Published: October 13, 2014 5:20 AM