लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे बुधवारी दुपारी सायन येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रात्री शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सोज्ज्वळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.उमा भेंडे या मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. ३१ मे १९४५ रोजी जन्मलेल्या उमा भेंडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव अनुसूया होते. बालपणीच त्यांनी ‘आकाशगंगा’ या चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर त्यांचा ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट आला आणि त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाच्या दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांचे ‘अनुसया’ हे नाव बदलून, त्यांना ‘उमा’ हे नाव दिले आणि पुढे याच नावाने त्या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाल्या. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘भालू’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘मधुचंद्र’, ‘चटकचांदणी’, ‘आपण यांना पाहिलंत का?’, ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’, ‘आई थोर तुझे उपकार’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ या चित्रपटासाठी त्यांना राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते. राज्य शासनाचा २०१३-१४ या वर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन, त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व चित्रकार प्रकाश भेंडे हे त्यांचे पती आहेत.मराठी चित्रपट क्षेत्राने सोज्ज्वळ अभिनेत्रीला गमाविले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांसमवेत हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. ‘दोस्ती’ या चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे.- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:47 AM