नागपूर : मॉर्निंग वॉक करून घराकडे निघालेले ज्येष्ठ आर्किटेक्ट एकनाथराव निमगडे (७२) यांच्यावर गावठी पिस्तुलामधून बेछूट गोळ्या झाडून दुचाकीस्वार हल्लेखोर पळून गेला. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या निमगडे यांचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत वर्दळीच्या अग्रसेन चौकाजवळ मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गंजीपेठमध्ये राहणारे निमगडे रोज सकाळी पत्नीसह फिरायला जात होते. स्कुटीने घरून निघाल्यानंतर गांधीबाग गार्डनजवळ स्कुटी ठेवायची, गार्डन परिसरात पायी फिरल्यानंतर पुन्हा स्कुटीने घराकडे परत जायचे, असा त्यांचा नित्यक्रम होता. आज काही कारणामुळे पत्नी घरीच थांबल्या आणि ते एकटेच फिरायला निघाले. स्कुटीवरून घराकडे परतत असताना त्यांच्या मागावर असलेल्या अॅक्टिव्हावरील हल्लेखोराने मिर्झा गल्लीत त्यांना गाठले. आवाज देऊन लक्ष वेधल्यामुळे निमगडे यांनी स्कुटी थांबवली. हल्लेखोराने लगेच गावठी पिस्तुल काढून त्यांच्यावर पाच ते सात गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्याने निमगडे स्कुटीवरून खाली पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेला. गोळीबार आणि निमगडे यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूची मंडळी आली. बाजूलाच असलेल्या तहसील ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहचले. बेशुद्धावस्थेतील निमगडे यांना मेयोत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असताना त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. (प्रतिनिधी)
नागपुरात वयोवृद्ध आर्किटेक्टची हत्या
By admin | Published: September 07, 2016 5:18 AM