पुणे : चितळे बंधू मिठाईवाले आणि चितळे उद्योग समूहाचे संस्थापक रघुनाथराव तथा भाऊसाहेब चितळे (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले़ सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे भाऊ नानासाहेब व काकासाहेब चितळे, मुकुंदराव चितळे, चिरंजीव माधवराव व श्रीकृष्ण चितळे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे़ खमंग बाकरवडीने जगभरात चितळे ब्रँड लोकप्रिय केलेल्या चितळे उद्योग समूहाची स्थापना १९४०च्या दशकात सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे रघुनाथराव यांचे वडील भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध गोळा करून डेअरी व्यवसाय सुरू केला. सातारा जिल्ह्यातील लिंब गोवे येथे २२ आॅक्टोबर १९२० रोजी रघुनाथराव यांचा जन्म झाला़ शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांसोबत दुग्धव्यवसायात पदार्पण केले़ १९५०मध्ये त्यांनी ‘चितळे बंधू मिठाईवाले’ या नावाने कंपनी स्थापन केली़ उत्तम गुणवत्ता, सचोटीच्या जोरावर चितळे दूध पुणे व परिसरात अल्पावधीतच लोकप्रिय झाले़ त्याचवेळी दुग्धजन्य पदार्थांसाठीही चितळे बंधू मिठाईवाले पुणेकरांच्या पसंतीस उतरले़ दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडाबरोबरच इतर खाद्यपदार्थ त्यांनी बाजारात आणले़ अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ व कायम नावीन्याचा ध्यास असलेल्या भाऊसाहेबांनी शिक्षण प्रसारक मंडळी, जोशी हॉस्पिटल, पुणे हार्ट ब्रिगेड आणि मिठाई फरसाण व दुग्धव्यवसाय संघाचे अध्यक्षपद भूषवले होते़ (प्रतिनिधी)
ज्येष्ठ उद्योजक भाऊसाहेब चितळे यांचे निधन
By admin | Published: March 21, 2016 3:28 AM