पुणे : ज्येष्ठ बालसाहित्यिक, कथालेखिका, कवयित्री सरिता पदकी यांचे अमेरिकेत वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले आहेत.पदकी यांनी बालसाहित्य, कथा, कविता, अनुवाद अशा स्वरूपाचे विविधांगी लेखन केले. ‘गुटर्र गु गुटर्र गु’, नाच पोरी नाच’ या बालकविता संग्रहासह ‘जंमत टिंपू टिल्लूची’ हा कथासंग्रह त्यांचा विशेष गाजला. १९६०च्या दशकानंतर लक्ष वेधून घेणाऱ्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यामध्ये ‘बारा रामाचं देऊळ’ आणि ‘घुम्मट’ या कथासंग्रहाचा समावेश आहे. ‘चैत्रपुष्प’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे. त्यांनी लिहिलेली ‘बाधा’, ‘खून’ आणि ‘सीता’ ही नाटके देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. करोलिना मारिया डी जीसस यांच्या ‘चाइल्ड आॅफ द डार्क’ या ब्राझीलमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या निग्रो स्त्रीच्या आत्मनिवेदनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘काळोखाची लेक’ तसेच यूजीन ओ नील यांच्या नाटकाचा अनुवाद ‘पांथस्थ’, वेस्टिंग हाऊसच्या चरित्राचा अनुवाद ‘संशोधक जादूगार’ व ‘सात रंगाची कमान माझ्या पापण्यांवर’ हा जपानी भाषेतील काव्याचा अनुवाद त्यांनी केला आहे. त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद होता. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ कथालेखिका सरिता पदकी यांचे निधन
By admin | Published: January 05, 2015 4:36 AM