- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचे गुरूवारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते नानावटी रूग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत होते. अखेर या जीवघेण्या आजारासोबतची त्यांची लढाई अयशस्वी ठरली. राव यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शशांक, मुलगी शिल्पा आणि नातवंडे असा परिवार आहे.शशांक राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा कॅनडाला वास्तव्यास असून शनिवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी त्या मुंबईत येतील. तोपर्यंत पार्थिव शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. शनिवारी शिल्पा आल्यानंतर सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत राव यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येईल.गोरेगावातील लिंक रोड शेजारील बांगुर नगरमधील जलनिधी सोसायटी येथील राहत्या घरापासूनच अंत्ययात्रेला सुरूवात होईल. दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.कामगार क्षेत्रातील अनेक संघटित आणि असंघटित कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व राव करत होते. महापालिका कर्मचारी, फेरीवाले, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक, बेस्ट अशा विविध कामगारांच्या संघटनांचे नेतृत्त्व करताना राव यांनी रस्त्यावर उतरून हजारो आंदोलने केली. दिवंगत कामगार नेते दत्ता सामंत यांच्यानंतर एकमेव लढवय्ये नेतृत्त्व म्हणून राव यांची ओळख होती.त्यांच्या जाण्याने उभ्या कामगार विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.............................................लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआडशरद राव यांच्या निधनाने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. बॉम्बे लेबर युनियनपासून आपल्या कामगार चळवळीला सुरुवात करणाऱ्या राव यांचा मुंबईतील कामगारक्षेत्रावर मोठा प्रभाव होता. महापालिका कर्मचारी, बेस्ट उपक्रम, फेरीवाला, रिक्षा चालक-मालक, टॅक्सी यासह विविध संघटनांचे नेतृत्व करताना त्यांनी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जोपासणाऱ्या राव यांच्या निधनाने कामगार चळवळीचे नुकसान झाले आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री