Gautami Patil Vs Indurikar Maharaj: गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची चर्चा राज्यभरात सुरू आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलसंदर्भात एक विधान केले होते. याला गौतमी पाटील हिने प्रत्युत्तर दिले होते. आता गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज या दोघांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर भाष्य करताना सल्ला दिला आहे. दोघांनाही आपापल्या क्षेत्रातील लोक नावे ठेवतात. गौतमी पाटील हिने लावणीची संस्कृती बिघडवली आणि वारकरी सांप्रदायातील लोक इंदुरीकर महाराजांना नावे ठेवतात, असे सदानंद मोरे यांनी म्हटले आहे. यामुळे दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, अशी खोचक टीका सदानंद मोरे यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?
गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा तर तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणही दिले जात नाही, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी खंत व्यक्त केली होती.
इंदुरीकर महाराजांच्या टीकेवर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण
इंदुरीकर महाराज यांनी टीका केल्यानंतर गौतमी पाटीलने त्यावर स्पष्टीकरण दिले. ते महाराज आहेत. मी त्यांच्याविषयी काय बोलणार. फक्त इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. इंदुरीकर महाराज सांगतात तेवढे माझे मानधन नाही. प्रेक्षकांनी ध्यानात घ्यावे की, तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही. आमच्या टीममध्ये ११ मुली आहेत. आमची एकूण २० जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढे घेत नाही, असे गौतमी पाटीलने स्पष्ट केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"