ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. वामन होवाळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना असा परिवार आहे.
मूळचे सांगलीचे असलेले वामन होवाळ यांचे उच्च शिक्षण मुंबईत झाले. त्यांची पहिली कथा माणूस (१९६३) कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटाआडवाटा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर मजल्याचं घर, पाऊसपाणी या कथा इंग्रजी, फ्रेंच भाषेत अनुवादित झाल्या आहेत. जपून पेरा बेणं, आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात ही त्यांची लोकनाट्येही प्रसिद्ध आहेत.