- राज चिंचणकरमुंबई : भातुकलीच्या खेळामधली...,भेट तुझी माझी स्मरते..,या जन्मावर या जगण्यावर.., शुक्रतारा मंदवारा.., स्वरगंगेच्या काठावरती अशा अनेक अजरामर भावगीतांद्वारे संगीत रसिकांच्या मनावर अढळ राज्य करणारे ज्येष्ठ गायक अरुण दाते रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी सकाळी ६च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अतुल दाते, सून व नातू असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या स्वरमालेतील शुक्रताऱ्याचा अस्त झाल्याची भावना संगीत क्षेत्रातून व्यक्त होत आहे. रविवारी सायंकाळी ५च्या सुमारास अरुण दाते यांच्या पार्थिवावर सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी यशवंत देव, प्रभाकर जोग, श्रीरंग भावे, मंदार आपटे, मिलिंद इंगळे, वरद कठापूरकर आदी संगीत क्षेत्रातील जुन्या व नव्या पिढीतील मान्यवर उपस्थित होते.दाते यांचा जन्म ४ मे १९३४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव अरविंद असे होते. इंदूरचे बडे प्रस्थ असलेले रामूभैया दाते हे त्यांचे वडील. अरुण दाते यांच्या गायकीला इंदूरमध्येच प्रारंभ झाला. इंदूरजवळ असलेल्या धार येथे कुमार गंधर्वांकडे अरुण दाते यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. अरुण दाते यांच्या आवाजाची पट्टी मुलायम होती. मात्र, त्यात घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले होते. त्यामुळे त्यांचे गाणे भारदस्त वाटायचे, पण त्यांच्यातल्या गायकाला पु. ल. देशपांडे यांनी प्रथम हेरले. पु. ल. यांनीच रामूभैयांना ‘गायक अरुण दाते’ यांची प्रथम ओळख करून दिली. वास्तविक, या काळात अरुण दाते हे मुंबईत टेक्स्टाइल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. मात्र, त्यांच्यात उपजत असलेल्या गायकीची ओळख झाल्यावर, त्यांच्या वडिलांनीच त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.तेव्हाचा काळ हा आकाशवाणीचा होता. १९५५च्या सुमारास अरुण दाते यांचा स्वर आकाशवाणीवरून कानी पडू लागला. इथेच विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींच्या ते सान्निध्यात आले. आकाशवाणीवर उमेदवारी करत असतानाच, १९६२ मध्ये ‘शुक्रतारा मंदवारा’ ही त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली आणि या गाण्याने या गाण्याने अक्षरश: चमत्कार घडवला. रसिकांचे उदंड प्रेम या गाण्याच्या माध्यमातून अरुण दाते यांना मिळाले.कविवर्य मंगेश पाडगावकर आणि ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचा त्यांना लाभलेला सहवास, त्यांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देऊन गेला. गीत मंगेश पाडगावकर, संगीत यशवंत देव, स्वर अरुण दाते हे समीकरण घट्ट होत गेले आणि या त्रयीने संगीत रसिकांना अनेक दशके भावगीतांच्या दुनियेत चिंब भिजवून टाकले. श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनाखालीही त्यांनी गाणी गायली, तसेच कविवर्य शंकर वैद्य यांच्या गीतांनाही अरुण दाते यांचा स्वरसाज लाभला.दाते यांनी परदेशातही आपल्या गाण्यांच्या मैफली गाजविल्या. एकल गायनासह अरुण दाते यांनी अनेक गायकांच्या साथीने गाणी गायली आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, तसेच नव्या पिढीतील कविता कृष्णमूर्ती अशा गायकांसोबत त्यांनी द्वंद्वगीते गायली आहेत. अरुण दाते यांनी गायनासोबतच लेखणी हाती धरत ‘शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्राला साक्षात पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे. १९९३ मध्ये अमेरिकेतील तुसाँ सिटीतर्फे त्यांना मानद नागरिकत्व मिळाले होते. पहिला ‘गजाननराव वाटवे पुरस्कार’, पहिला ‘महेंद्र कपूर पुरस्कार’, महाराष्ट्र पत्रकार संघाचा ‘महाराष्ट्र भूषण’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते दाते यांची लोकप्रिय गाणीया जन्मावर या जगण्यावर, भेट तुझी माझी स्मरते, मान वेळावुनी धुंद बोलू नको, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंद वारा, अविरत ओठी यावे नाम, स्वरगंगेच्या काठावरती, हात तुझा हातात, काही बोलायाचे आहे, जेव्हा तिची नि माझी, डोळे कशासाठी, डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, दिल्या घेतल्या वचनांची, दिवस तुझे हे फुलायचे‘शुक्रतारा’ या शीर्षकाखालीच त्यांनी मराठी भावगीत गायनाचे २ हजार ५००हून अधिक कार्यक्रम केले. अर्थातच, रसिकजनांनी हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल करत, त्यांना प्रेमाची पावतीही बहाल केली. एकाच गायकाने, केवळ स्वत:ची गाणी गात कार्यक्रम करण्याचा संगीत विश्वातील हा विक्रम मानला जातो. मराठीसह उर्दू भाषेतल्या अवीट गोडीच्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या.दाते यांनी परदेशातही आपल्या गाण्यांच्या मैफली गाजविल्या. एकल गायनासह अरुण दाते यांनी अनेक गायकांच्या साथीने गाणी गायली आहेत. अरुण दाते यांनी गायनासोबतच लेखणी हाती धरत ‘शतदा प्रेम करावे’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
स्वरमालेचा शुक्रतारा लोपला, ज्येष्ठ गायक अरुण दाते काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:53 AM