नाशिक -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला हक्क चळवळीतील अग्रेसर नेत्या श्रीमती विजयाताई मालुसरे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, दोन कन्या, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य तसेच मायको (बाॅश) कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस सुनिल मालुसरे यांच्या त्या मातोश्री होत. एसटी कामगार संधटनेचे दिवंगत नेते विनायक तथा भाऊ मालुसरे यांच्या त्या पत्नी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नरेंद्र तथा नाना मालुसरे यांच्या त्या वहिनी होत. सामाजिक कार्यकर्ते आणि क्रीडा संघटक संजय मालुसरे यांच्या त्या काकू होत.
डाव्या विचाराचे पाईक असलेल्या आणि सामाजिक, राजकीय, कामगार, महिला, आदिवासी विकासकार्यात भरीव योगदान असलेल्या मालुसरे कुटुंबात विजयाताई यांनी सामाजिक विशेषत: महिला हक्क कार्यात मोठा ठसा उमटवला आहे. काॅ. गोदुताई परूळेकर, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे, कुसुमताई पटवर्धन आदी ज्येष्ठ नेत्यांशी विजयाताई यांचा निकटचा संबंध होता. या नेत्यांसमवेत त्यांनी विविध आंदेलनांत हीरीरीने भाग घेऊन नाशिक शहर व जिल्ह्यात महिलांचे संघटन केले होते. यासाठी केलेल्या आंदोलनात त्यांनी अनेकदा तुरूंगवास भोगला आहे.
महिला हक्क संरक्षण समिती या शहरातील तसेच राज्यात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या माध्यमातून अगणित महिलांच्या समस्यांचा पाठपुरावा आणि निराकरण त्यांनी केले आहे. महिला हक्क विषयक लढा आणि कायदेशीर मार्गदर्शन करताना असहाय्य महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विविध उपक्रम त्यांनी राबवले होते. आकाशवाणीवरून महिला हक्क विषयक माहिती आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत.
विजयाताई यांच्या निधनाने नाशिकच्या महिला हक्क कार्यात पाच दशके अथकपणे निरलसपणे कार्य केलेल्या आदरणीय व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशी भावना शहरातील सामाजिक, राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.