मुंबई : चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून देण्या आणि घेण्याच्या त्रासाने बुधवारी राज्यात आणखी चार जणांचे बळी घेतले. यापैकी तिघे रांगांमध्ये ताटकळत असताना मृत्यू पावले, तर एका बँक कर्मचाऱ्याचा कामाच्या अतिताणाने ड्युटीवर असताना मृत्यू झाला. नांदेडच्या सिद्धार्थनगर बळीरामपूर येथील रहिवासी दिगंबर मरिबा कसबे (६५) हे सकाळी साडेसातच्या सुमारास चंदासिंग कॉर्नर येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना भोवळ येऊन ते खाली कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.नंदुरबारच्या शहादा येथील स्टेट बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या सिकंदर पठाण (५०) यांना चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.भार्इंदरमध्ये नोटांसाठी रांगेत उभ्या असलेल्या दीपकभाई नरोत्तमदास शाह (५३) यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. दीपकभाई शाह हे सकाळी ७ च्या सुमारास बेसिन कॅथॉलिक बँकेत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे होते. नऊच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखायला लागले व ते चक्कर येऊन पडले. त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यात चलनटंचाईने घेतला चौघांचा बळी
By admin | Published: November 17, 2016 4:59 AM