मुंबई/पुणे: उष्णतेच्या लाटेने सलग दुसºया दिवशी सोमवारी महाराष्ट्र होरपळून निघाला. जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकºयाचा मृत्यू झाला. मुंबईसह खान्देश, विदर्भ, मराठवाड्याला चटके बसले. सर्वाधिक तापमान भिरा येथे तब्बल ४५ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. त्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये ४१.१ एवढे तापमान होते. पुढील तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ३७ आणि ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला.सांताक्रूझला रविवारी सर्वाधिक ४१ अंश तापमान नोंद झाले होते. त्यात ३८.७ अंशांपर्यंत घट झाली. सर्वाधिक पाऊस व तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या भिरा येथील पारा सरासरी पेक्षा तब्बल ६.३ अंशानी वाढून ४५ अंशावर स्थिरावला. खान्देशही भाजून निघाला असून जळगावचा पारा ४०.४ अंशावर होता. वासुदेव पाटील (५२, रा. म्हसवे ता. पारोळा) या शेतकºयाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मालेगाव ४०.२, नाशिक ३८.१ असे तापमान नोंदले गेले. बागायती पश्चिम महाराष्ट्रालाही झळ बसली. सांगली३९.२, कोल्हापूर ३७.२, सोलापूर ३९.९ असे तापमान होते.मराठवाड्यात उस्मानाबाद येथे ३९, औरंगाबाद ३८.३ आणि परभणीचा पारा ४०.४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. विदर्भात अकोला येथे सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमरावती ३९.८, चंद्रपूर ४०.२, नागपूर ३९.४, वाशीम ३९.४, वर्धा ४० अणि यवतमाळचे तापमान ३९.५ अंश नोंदविण्यात आले.हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.पूर्वेकडून येत असणाºया उष्ण वाºयामुळे राज्य आणि मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. शिवाय अरबी समुद्राकडून मुंबईकडे वाहणारे खारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. दुपारी हे वारे स्थिर होत असल्याने ते तापत आहेत. परिणामी तप्त वाºयामुळे पारा वाढला आहे. मंगळवारीही मुंबईचे वातावरण असेच राहील.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग
महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही होरपळला!, खान्देशात उष्माघाताचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 6:14 AM