वृद्ध पत्नीची ‘आयएमए’कडे तक्रारनागपूर : रामदासपेठ येथील एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे अमरावती येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बळी गेला. या हलगर्जीपणाबाबत मृत रुग्णाच्या वृद्ध पत्नीने इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्याकडे धाव घेतली असून, लेखी तक्रार सादर करीत सखोल चौकशीची मागणी केली आहे. गंगाधर बलिंगे रा. अमरावती असे मृत रुग्णाचे नाव असून, शालिनी बलिंगे असे या पीडित तक्रारकर्त्या महिलेचे नाव आहे. आयएमएला दिलेल्या तक्रारीनुसार गंगाधर बलिंगे यांना मागील काही दिवसांपासून त्रास होत होता. अमरावतीतील डॉक्टरांनी त्यांना नागपुरातील डॉ. मनोज सिंगरखिया यांच्याकडे रेफर केले. डॉ. सिंगरखिया यांचे रामदासपेठ येथे ‘शांता स्पाईन’ नावाने रुग्णालय आहे. गेल्या ८ सप्टेंबर रोजी बलिंगे यांना शांता स्पाईन येथे आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी शालिनीसुद्धा त्यांच्यासोबत होत्या. डॉ. सिंगरखिया यांनी तपासणी केली आणि ‘मानेची नस चार ठिकाणी ब्लॉक आहे, आॅपरेशन करावे लागेल’, असे सांगितले. इतकेच नव्हे तर सकाळी आॅपरेशन करून सायंकाळपर्यंत रुग्णाला सुटी देता येईल, असेही सांगितले. आॅपरेशनचा खर्च एक लाख रुपये येईल, आम्ही ९० हजार रुपये घेऊ.या खर्चात आॅपरेशन, औषधी, राहण्याचा, तपासण्या, नर्सिंग या सर्व खर्चांचा समावेश राहील. तुम्ही केवळ जेवणाचा डबा आणायचा, असेही सांगितले. त्यानुसार रात्री अॅडमिट करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता बलिंगे यांना ‘आॅपरेशन रूम’मध्ये नेण्यात आले. अर्ध्या तासाचे आॅपरेशन आहे, असे सांगण्यात आले होते. पण दुपारी ३ वाजले तरी पेशंटला आॅपरेशन रूमबाहेर आणण्यात आले नाही. या दरम्यान शालिनी बलिंगे या पेशंटबाबत वारंवार विचारणा करीत होत्या. रुग्ण गुंगीत आहे, थोड्या वेळाने रूममध्ये आणतो, असे डॉक्टरांनी सांगितले. ३.३० वाजताच्या सुमारास डॉ. सिंगरखिया यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आपल्या चेंबरमध्ये बोलाविले आणि सांगितले की, ‘तुमच्या पेशंटचे रक्त खूप गेले. त्यांचे हृदय बंद पडले होते. त्यांच्यावर आत उपचार सुरू आहेत.’ त्यानंतर दोन तास त्यांनी काहीच सांगितले नाही. सायंकाळी ५ वाजता पुन्हा बोलावण्यात आले आणि पेशंटला आदित्य हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल, असे सांगण्यात आले. आदित्य हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांना बाहेर काढले तेव्हा ते बेशुद्धच होते. डॉ. बारोकर यांच्या रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. यातच २२ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मुळातच डॉ. सिंगरखिया यांनी रुग्णाच्या आरोग्य सेवेबाबत मांडलेली भूमिका ही संशयास्पद आहे. जी वैद्यकीय शस्त्रक्रिया अर्ध्या तासात होणार होती, त्यासाठी पाच तास का लागले, याची आपण सखोल चौकशी करावी. यासोबतच माझ्या पतीची प्रकृती गंभीर झाली असतानाही डॉ. सिंगरखिया यांनी मला त्याबाबतचा तपशील पाच तासानंतरच दिला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आयएमएकडे केली आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा बळी
By admin | Published: October 23, 2014 12:27 AM