युनूस शेख ल्ल इस्लामपूर कृष्णा नदीकाठी वसलेले वाळवा तालुक्यातील बनेवाडी हे एक हजार लोकवस्ती आणि दीडशे उंबऱ्यांचं गाव. संजय यादव यांचे नदीकाठावरचे घर सोमवारी माता-पित्यांसोबत दोन तान्हुल्यांना घेऊन निपचित झाले... आणि गावात एकच खळबळ उडाली. खासगी सावकारीच्या सुलतानी संकटाला घाबरून हे चौघांचे कुटुंब काळाच्या पडद्याआड गडप झाले. त्याची चर्चा दिवसभर गावात दिसत होती. संजय भीमराव यादव, सौ. जयश्री संजय यादव, मुलगा राजवर्धन व आठ महिन्यांची तान्हुली समृध्दी यांचा, या हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेत बळी गेला. उगवतीच्या दिशेला तोंड करून झोपलेली ही दोन्ही मुले कधी उठतील व आपल्या दुडक्या चालीने अंगणात येऊन कधी खेळतील, याची वाट पाहणाऱ्या आया—बायांचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. बनेवाडीत गेल्यानंतर चौकातच हनुमानाचे मंदिर आणि त्याच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत दिसते. त्याच्या पाठीमागे पन्नास फुटांवर संजय यादव यांचे कौलारू आणि पत्र्याचे दुपाकी घर आहे. त्यांचे मूळ गाव बनेवाडीच. आई-वडिलांचे यादव हे एकुलते एक पुत्र होते. आई-वडिलांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले आहे. गावात यादव भावकी मोठी असली तरी, त्यांचे सख्खे नातेवाईक कोणीही नाहीत. संजय यादव यांना पहिल्या पत्नीच्या मृत्यूमुळे दोन-अडीच एकरांची वडिलार्जित शेती विकावी लागली. चरितार्थाचे दुसरे साधन नव्हते. दहावीपर्यंत शिकलेल्या यादव यांनी काहीकाळ खासगी रुग्णालयात कंपौंडर म्हणून काम सुरू केले. डॉक्टरांच्या हाताखाली काम करताना रुग्णांना गोळ्या देणे यासह विविध प्रकारच्या इंजेक्शनची माहितीही त्यांना झाली. जक्राईवाडीच्या पहिल्या पत्नीला त्यांनी स्वत:च इंजेक्शन टोचल्याचे बोलले जाते. त्यात तिचा अंत झाला. याप्रकरणी यादव यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यातून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी, कोर्टकचेऱ्यांसाठी त्यांना वडिलार्जित जमीन विकावी लागली. त्यामुळे जगण्याचे साधन म्हणून वाट्याने शेती करीत ताकारी येथे बेकरी पदार्थ विक्रीचा छोटासा व्यवसाय त्यांनी सुरू केला. पडवळवाडी माहेर असलेली दुसरी पत्नी जयश्री आणि संसारवेलीवर फुललेल्या राजवर्धन व समृध्दी या दोन मुलांसह ते कसेबसे जगत होते. पत्नी जयश्री संसाराला मदत म्हणून दोन म्हैशींचा सांभाळ करीत, शिलाईकामही करीत होती. मात्र संजय यांचे पाय सावकारीच्या पाशात अडकत चालले होते. स्वत:साठी २0 हजार आणि मित्रासाठी २0 हजार रुपये खासगी सावकाराकडून घेण्यासाठी केलेली मध्यस्थी, चक्रवाढ व्याजासह पाच लाखांवर जाऊन ठेपली. सावकाराने पैशाच्या वसुलीसाठी जिवे मारण्याच्या धमकीसह गोठ्यातील दावणीच्या म्हैशी घेऊन जाण्याचा तगादा लावल्याने सैरभैर झालेल्या संजय यांनी अख्ख्या कुटुंबालाच मृत्युशैयेवर लोळवत सर्वच त्रासाला पूर्णविराम दिला! गावात दिवसभर या घटनेचीच चर्चा दिसत होती. आसपासच्या गावांतून आलेल्या बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. जुन्या घटना : नव्या घटनेमुळे ताज्या... सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून बनेवाडी येथील एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपविण्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर, आठ वर्षांपूर्वी पेठ (ता. वाळवा) येथे अशाच पध्दतीने घडलेल्या मृत्यूच्या भयाण तांडवाची थरारक आठवण जागी झाली. संजय यादव यांनी सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून, हृदयावर दगड ठेवत दोन्ही चिमुरड्यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर पत्नी आणि स्वत:लाही गळफास लावून घेतला. जुन्या घटना : नव्या घटनेमुळे ताज्या... सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून बनेवाडी येथील एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपविण्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर, आठ वर्षांपूर्वी पेठ (ता. वाळवा) येथे अशाच पध्दतीने घडलेल्या मृत्यूच्या भयाण तांडवाची थरारक आठवण जागी झाली. संजय यादव यांनी सावकारी कर्जाच्या त्रासाला कंटाळून, हृदयावर दगड ठेवत दोन्ही चिमुरड्यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर पत्नी आणि स्वत:लाही गळफास लावून घेतला. आठ वर्षांपूर्वी २६ डिसेंबर २00७ रोजी पेठ येथील संजय पेठकर या माथेफिरुने स्वत:ला असाध्य रोग जडल्यानंतर विमनस्क अवस्थेत त्या रात्री जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या मॅग्नेशियम सल्फेटचे पाण्यामध्ये द्रावण करून ते इंजेक्शनद्वारे संपूर्ण कुटुंबाला दिले होते. यामध्ये त्याने जन्मदात्या आईसह मुलगी आणि पोटामध्ये आणखी एक जीव वाढविणाऱ्या गरोदर पत्नीचीही हत्या केली होती. त्यानंतर पळून गेलेल्या संजय पेठकरचा पोलिसांना अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. बनेवाडी व पेठ येथील घटनांमधील कारणे वेगळी असली तरी, अख्ख्या कुटुंबाला मृत्यूच्या जबड्यात ढकलण्याचा थरार यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळाला.
सावकारी पाशात अख्ख्या कुटुंबाचा बळी
By admin | Published: December 28, 2015 11:48 PM