मुंबई : समुद्राच्या उंच लाटांची मजा घेण्यासाठी मरीन ड्राइव्हच्या समुद्रावर दाखल झालेल्या दोन तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना येथे घडली. रतन चव्हाण (१९) असे मृत तरुणाचे नाव आहे.कल्याण येथे वास्तव्य करणारे रतन चव्हाण (१९) आणि चेतन चव्हाण (१६) हे दोन चुलत भाऊ रविवारी सायंकाळी मरीन ड्राइव्हच्या समुद्रकिनारी दाखल झाले होते. येथील लाटांची मजा घेण्यासह त्यांना बंदिस्त करण्यासाठी तरुणांनी आपला कॅमेरा बाहेर काढला. मात्र, भरतीदरम्यान वाढलेल्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यातच ते भरतीच्या पाण्यात बुडू लागले. याची माहिती मिळताच येथे तैनात असलेल्या लाइफ गार्डने अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. काही वेळातच त्यांनी चेतनला पाण्यातून बाहेर काढले, तर तासभर शोध घेतल्यानंतर रतन त्यांना गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यानंतर, पोलिसांनी त्याला जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, अशा घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी़ भरती असताना समुद्राजवळ जाऊ नये व दूरवरूनच भरतीची मजा लुटावी, असे आवाहन महापौर सुनील प्रभू यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
मरीन ड्राइव्हवर लाटांनी घेतला एकाचा बळी
By admin | Published: June 16, 2014 3:44 AM