गेवराई (बीड) : हंडाभर पाण्यासाठी तळणेवाडी (ता. गेवराई) येथे एका महिलेला शनिवारी आपल्या प्राणास मुकावे लागले. पाणी शेंदताना तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. तालुक्यात आतापर्यंत पाच जणांना पाण्यासाठी जीव गमवावा लागला. छबूबाई बाबुराव खरसाडे (४०) असे मृताचे नाव आहे. खरसाडे कुटुंब अल्पभूधारक असून, पती बाबुराव हे मोलमजुरी करतात. दुपारी साडेतीनच्या सुमारास छबूबाई या घराजवळच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी शेंदताना तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. जवळच्या झाडाखाली काही शेतकरी बसले होते. त्यांनी विहिरीत उड्या घेऊन त्यांना विहिरीबाहेर काढले. उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. छबूबाई यांना एक विवाहित मुलगी, एक मुलगा आहे.पाण्यासाठी जिल्ह्यात नऊ जणांचे बळी गेले होते. यात सर्वाधिक ५ बळी एकट्या गेवराई तालुक्यात गेले. बीडमध्ये दोन, केज व आष्टीत प्रत्येकी एकास प्राणास मुकावे लागले आहे. (प्रतिनिधी)गावाला एक टँकरतळणेवाडी हे साडेहजार लोकसंख्येचे गाव असून, गावाची मदार केवळ एका टँकरवर आहे. गावालगत असलेल्या खरसाडे वस्तीवर डझनभर कुटुंबे वास्तव्यास आहेत. तेथे पाण्याची कुठलीही सुविधा नाही. टँकरही येत नाही. वस्तीवरील रहिवाशी जवळपासच्या विहिरी, बोअरमधून पाणी घेतात.
हंडाभर पाण्यासाठी गेला महिलेचा बळी
By admin | Published: April 24, 2016 2:28 AM