अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या तेल्हारा तालुक्यातील महिलेचे सिझर केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे या महिलेचा बळी गेला असून, येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी शारदा गोपाल तायडे या महिलेला प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झाल्यानंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी येथील डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्याची मागणी केली; मात्र कुणाचेही सोयरसूतक नसलेल्या येथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हलगर्जी केली. त्यामुळे या महिलेची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे घाबरलेल्या येथील डॉक्टरांनी महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा काही तासातच मृत्यू झाला. सिझरनंतर दोन दिवस उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर वेळीच उपचार केले असते, तर आज तिचा मृत्यू झाला नसता; मात्र येथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्यामुळे शारदाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केली असून, सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शारदाने एका मुलीला जन्म दिला असून, तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.** प्रशासन पांघरूण घालणार ?जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बालकांचे मृत्यू होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गलथान कारभाराचा कळस म्हणजे मागील तीन महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या एका महिलेचे बाळच गायब झाले होते. शोध घेतल्यानंतर सदर बाळ शौचालयाच्या टाक्यात सापडल्याचे सांगण्यात आले. डीएनए चाचणी करण्यात येणार, खर्या बाळाचा शोध घेण्यात येणार, या प्रकारचे आश्वासन त्यावेळी महिलेच्या नातेवाइकांना दिले; मात्र प्रकरण दडपण्यात आले. त्यानंतर पातूर येथील एका महिलेच्या पोटात प्रसूतीनंतर कापसाचा बोळा ठेवण्यात आला होता. सोमवारी एका महिलेचा येथील डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि हलगर्जीमुळे मृत्यू झाला असून, या प्रकरणावरही येथील वैद्यकीय अधीक्षिका पांघरूण घालणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरने घेतला महिलेचा बळी
By admin | Published: June 16, 2014 8:47 PM