कमलाकर कांबळे
नवी मुंबई-शहरात एकूण ८0 दगडखाणी आहेत. दगडखाणीत मागील २५ वर्षांत झालेल्या अपघातांत जवळपास १३0 मजुरांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाविषयी काम करणाऱ्या संस्थांनी मृत्यूचे तांडव करणाऱ्या या दगडखाणींच्या विरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.स्टोन क्रशरमुळे हवेत धुळीचे प्रमाण प्रचंड वाढते. ब्लास्टिंग प्रक्रियेमुळे दगडखाणीजवळील घरांना तडे जातात. वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आणि श्वसनाचे गंभीर आजार नागरिकांना जडले आहेत. पर्यावरणाच्या हानीबरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दगडखाणींना दिलेल्या परवाना क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात डोंगर पोखरले जात आहेत. जंगलतोडीमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. एकूणच दगडखाणींच्या माध्यमातून भविष्यात मोठे संकट येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काही वर्षांपूर्वी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील दगडखाणींच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. नियमानुसार खाणीतील खंदकांचा आकार ६ बाय ६ मीटरपेक्षा जास्त असू नये, त्याचा उतार ६० डिग्रीपेक्षा जास्त असता कामा नये, असे असताना खाणमालक मात्र सर्रास नियमांपेक्षा जास्त प्रमाणात खाणकाम करीत असतात. स्टोन क्रशर असेल तर त्याची परवानगी घेतली आहे किंवा नाही?, ब्लास्टिंगची प्रक्रिया होत असेल तर त्याची परवानगी आहे किंवा नाही? खाण परिसरातील प्रदूषण नियंत्रणात असल्याची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करून घेतली आहे किंवा नाही? आदी बाबींची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली होती. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, तर नवी मुंबईतील सहा दगडखाणींचे परवाने रद्द करण्यात आले होते. याविरोधात दगडखाण मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात अंबरनाथ येथे राहणाऱ्या पर्यावरणप्रेमी नाझीया साजिद जमादार यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला आहे. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात होवून मजुरांचे बळी जात आहेत. याची पुराव्यानिशी माहिती या अर्जात दिली आहे.