विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. १०८ रुग्णवाहिका बंद असल्याने आणि ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी पालीतील एका ५७ वर्षीय रुग्णाला हकनाक आपला प्राण गमवावा लागला.
पालीतील समर्थ नगरमधील एका ५७ वर्षीय रुग्णास कोविड १९ मुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यांना ताबडतोब पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णाला नेण्यासाठी १०८ नंबर रुग्णवाहिका बंद होती. मागील सहा ते सात दिवसांपासून इंजिनमध्ये बिघाड असल्याने ही रुग्णवाहिका बंद आहे, तसेच ऑक्सिजन नसलेली दुसरी कुठलीही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर त्यांना त्यांच्या खासगी गाडीमधून ऑक्सिजनशिवाय रोहा येथे रुग्णालयात न्यावे लागले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली, असे प्रत्यक्षदर्शी कपिल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
केवळ रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन नसल्याने या रुग्णाचा जीव गेला आहे. लागलीच उपचार आणि रुग्णवाहिका मिळाली असती, तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे हे झाले आहे. - कपिल पाटील, प्रत्यक्षदर्शी१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने ती काही दिवसांपासून बंद आहे. १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका महिलांच्या प्रसूतीसाठी वापरली जाते. आवश्यकता असल्यास कोलाड व रोह्यावरून रुग्णवाहिका मागवतो. तिथे उपलब्ध असल्यास रुग्णवाहिका मिळते, तसेच महाड येथे इमारत दुर्घटना झाल्यामुळे जिल्ह्यातील काही रुग्णवाहिका तिथेही गेल्या आहेत. - डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी१०८ रुग्णवाहिका बंद असली, तरी ३ कंपन्यांमधील रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातील एका रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था आहे, तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविला आहे. लोकांनी थोडी जरी कोविडची लक्षणे आढळल्यास घरी न बसता किंवा खासगी डॉक्टरकडे उपचार न घेता, ताबडतोब सरकारी दवाखान्यात जावे. - दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागडटाळाटाळ : मृत व्यक्ती दोन वेळा वावळोली येथील कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. तिथे त्यांना लक्षणे नाहीत असे सांगून आणि कोविडची तपासणी करायची असल्यास रोहा किंवा अलिबागला जा असे सांगण्यात आले.