नाशिक आॅनलाइन लोकमत
जिल्ह्यातील येवला तालुक्यात सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टरवर असलेल्या ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्रात राजापूर जवळील वनकक्षाच्या हद्दीत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने काळवीटच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात शिकाऱ्यांपैकी एकाने बंदूकीने गोळी झाडून काळवीटच्या मादीला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजापूर जवळील कोळम खुर्द शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोळम -ममदापुर चौफुली जवळ मालेगावचे पाच शिकारी हरिणाची शिकार करण्यासाठी दुपार पासुन दबा धरून बसलेले होते. सुर्यास्त होताच या शिकाऱ्यांनी प्रतिबंधित संवर्धन क्षेत्रात प्रवेश करून एका पाच वर्षीय काळवीटच्या मादीला गोळ्या घालून ठार केले. सदर बाब वनविभागाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपाल अशोक काळे यांच्यासह गावकऱ्यांनी धाव घेत संशयित शिकाऱ्यांचा पाठलाग केला. यावेळी कोळम-खरवंडी गावातील तरू णांनी संशयित आरोपी दस्तगीर आलम हारुण (रा.मालेगाव) यास पकडून ठेवले; मात्र अन्य संशयित आरोपी मोटार घेऊन फरार होण्यास यशस्वी झाले. घटनास्थळी व आजूबाजूच्या परिसरात गुन्ह्यात वापरलेले हत्यार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला;मात्र हत्त्यार आढळून आले नाही. वनविभागाने संशयित वाहनाचे वर्णन पोलिसांना कळविले असून या संशयितांचा माग काढण्यासाठी वनविभागाचे स्वतंत्र दक्षता पथक रवाना झाले आहे. दस्तगीर याने काळवीटची शिकार केल्याची कबुली दिल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे. त्याच्या साथीदारांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.