पिंपरी : लोकसभा निवडणकीची मतमोजणी आणि निकालास आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने उमेदवार, कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीच्या दिवसाबरोबर, प्रमुख लढत असलेल्या उमेदवारांनी विजयी मिरवणूकींचे नियोजनाची तयारी सुरू केली आहे. मावळमधील दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास आहे. राजकीय कोलांट्या उड्या, बंडखोरी, उमेदवारासाठी धावाधाव अशा विविध विषयांनी मावळ लोकसभेची निवडणूक सर्वार्थाने गाजली आहे. मावळात काय होणार? याबाबतची उत्सुकता कायम आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडूण येणार की शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप याविषयीची चर्चा खूप रंगली आहे. मावळची जागा नक्की कोणाला मिळणार या विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झीट पोलमध्येही या जागेबाबत निश्चित असे मत राजकीय विश्लेषकांनी नोंदविलेले नाही. आता निकालास काही तासांचा अवधी शिल्लक राहिल्याने दोनही उमेदवारांना मीच निवडूण येणार हा आत्मविश्वास आहे. त्यानुसार त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. वाहतुकीचे नियोजन मावळ आणि शिरूर लोकसभेची मतमोजणी बालेवाडी क्रीडा संकुलात शुक्रवारी (ता. १६) होणार आहे. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतमोजणी शांततेत पार पाडावी, म्हणून हिंजवडी पोलिसांनी स्वतंत्र तीन ठिकाणी मतमोजणी निकाल ऐकण्याची व पार्किंगची व्यवस्था केली आहे. (प्रतिनिधी)
विजयाची माळ माझ्याच गळ्यात!
By admin | Published: May 15, 2014 5:04 AM