ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), दि. २१ - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्यानंतर आज त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळण्यावरून निर्माण झालेला वाद संपला आहे. गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात महिलांनी गर्भगृहात प्रवेश केला. स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे यांच्यासह ४ महिलांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेतले. काल मंदिराच्या गर्भगृहात चौथ्यांदा प्रवेश फसल्यानंतर आज स्वराज्य महिला संघटनेला मंदिरात जाण्यास यश मिळाले.
शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा लढा चालू असताना त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात प्रवेश करण्याची मागणी जोर धरु लागली होती. स्वराज्य संघटनेच्या महिला यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मंदिर प्रशासन आणि स्थानिक भाविकांचा त्यांना प्रवेश देण्यास विरोध होता.
दरम्यान, मंदिराच्या गर्भगृहात बुधवारी पहाटे चौथ्यांदा दर्शनासाठी प्रवेश करण्यासाठी जात असताना स्वराज्य संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह त्यांच्याबरोबरच्या महिलांना मारहाण केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वरच्या चार माजी नगराध्यक्षांसह इतर ग्रामस्थांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय तुंगार, योगेश (पिंटू) तुंगार, प्रशांत तुंगार आणि अनघा फडके अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.