नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या काही दिवसांत जाहीर होतील मात्र त्याआधीच महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील पदाधिकारी पक्ष आणि महायुती सरकारवर नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विदर्भातील १० जिल्हाध्यक्ष याबाबत बैठक घेणार आहेत. ते पक्ष आणि सरकारवर नाराज असल्याचं बोललं जातं.
याबाबत जिल्हाध्यक्ष बाबा गुजर म्हणाले की, पक्षावर नाराजीचा प्रश्न नाही. सध्या जे महायुतीचे सरकार आहे. त्यात जिल्हाध्यक्षांना ज्या कामांची अपेक्षा होती ती कामे पूर्ण होत नाहीत. आमच्या पक्षाचे मंत्री असले किंवा महायुती सरकारमधील मंत्री असले ते आमच्या जिल्हाध्यक्षांची कामे करत नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभेत विदर्भातून आम्हाला एकही जागा मिळाली नाही. भविष्यात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पक्षाला जागा सुटणार की नाही हा देखील जिल्हाध्यक्षांसाठी महत्त्वाचा विषय आहे. जिल्हा नियोजन निधी, संघटनांचा विषय, विधान परिषदेवर विदर्भातील एकाला संधी द्यावी, अशा माणसाला संधी द्या ज्याचा संघटनेला फायदा झाला पाहिजे. उगाच जवळ फिरणाऱ्याला दिले तर त्याचा संघटनेला फायदा होणार नाही आणि संघटना विदर्भात वाढणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनं याआधी विदर्भात ज्यांना संधी दिली त्यांचा फायदा संघटनेला झाला नाही. विदर्भात आम्हाला एक विधान परिषदेची आमदारकी हवी. आजच्या जिल्हाध्यक्ष बैठकीत आम्ही जे काही ठराव मांडू त्याबद्दल आमचे विदर्भातील नेते प्रफुल पटेल आणि संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना वेळ देऊन व्यथा मांडणार आहे. जिल्हा नियोजन समितीत अजित पवारांच्या पक्षाचे सदस्य पाठवलेले असतील तर त्यांना काहीच निधी मिळत नसेल तर संघटना चालवायची कशी असा प्रश्न बाबा गुजर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, निधी विषयात दादांशी बोलणं झालं असून त्यांनी लक्ष घालून जिल्हाध्यक्षांना निधी वाटप करावे अशी मागणी केली आहे. संघटनेत राहून आरोप करत नाही, मात्र सर्व जिल्हाध्यक्षांचा अनुभव हा कुठल्याही मंत्र्यांकडे गेले तरी काम होत नाही असा आहे. चहापेक्षा किटली गरम म्हणजे मंत्र्यांच्या पीए असतात. आम्ही अजितदादांना सोडून जाणार नाही. प्रफुल पटेल हे आमचे मार्गदर्शक आहे. आमच्या जिल्हाध्यक्षांची जी अडचण आहे ती आम्ही संघटनेकडे मांडतोय, आमच्या व्यथा दुसऱ्यांना सांगणार का असा सवालही बाबा गुजर यांनी उपस्थित केला.