पुणे : राज्यातील तापमानाचा पारा चढाच असून रविवारी विदर्भातील सर्व प्रमुख शहरांतील कमाल तापमान चाळिशीच्या पुढेच होते. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुढील तीन-चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यातही विदर्भात उष्णतेची लाट असून बहुतेक प्रमुख शहरांतील तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. मराठवाड्याची स्थितीही अशीच आहे. उस्मानाबाद, परभणी, नांदेड या शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे राहिले.मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील तापमानाने चाळिशी गाठली आहे. रविवारी मालेगाव येथे सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, जळगाव व पुण्यात लोहगाव येथील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे गेले होते. वर्ध्याखालोखाल विदर्भातील अकोला, चंद्रपुर, नागपूर, अमरावती, यवतमाळ या शहरांच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पुढील तीन दिवस राज्यात बहुतेक हवामान कोरडे राहील. तर पुण्यात अंशत: ढगाळ वातावरण राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
विदर्भ चाळिशीच्या पुढेच
By admin | Published: April 11, 2016 3:03 AM