प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफायानागपूर : विदर्भात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विदर्भात झालेल्या जंगी सभा आणि युती फिस्कटल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने भाजपाने विदर्भात कधी नव्हे एवढ्या ४४ जागांवर कब्जा केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला तब्बल २५ जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गृहजिल्ह्यात तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून ते खुद्द आपल्या चिरंजीवांनाही विजय मिळवून देऊ शकले नाहीत. चार जिल्ह्यांत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे यंदा विदर्भातून २८ नवे चेहरे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. फक्त सावनेर मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सातपैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. येथे शिवसेना एक आणि राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळाले. अमरावतीत भाजपाला चार जागांवर यश मिळाले. काँग्रेस दोन तर दोन जागा अपक्षांच्या पदरी पडल्या. वर्धा जिल्ह्यात भाजपा दोन तर काँग्रेस दोन अशी स्थिती आहे. चंद्रपुरात चार जागी भाजपाला यश मिळाले. वरोऱ्यात शिवसेनेने खाते उघडले तर विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीची जागा जिंकत काँग्रेसची लाज राखली. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपाचा झेंडा फडकला. गोंदियात तीन जागांवर भाजपाला यश आले असून गोंदियाची जागा काँग्रेसने राखली. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये विजयश्री मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वाशिम जिल्ह्यात भाजपा दोन तर काँग्रेस एक अशी स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात भाजपा तीन, शिवसेना दोन तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे.
विदर्भात भाजपाला सर्वाधिक ४४ जागा
By admin | Published: October 20, 2014 12:42 AM