नागपूर : नगरपरिषदात काँग्रेस-राष्ट्रवादीला धोबीपछाड दिल्यानंतर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत विदर्भातील पाच जिल्ह्यात भाजपाने मैदान मारले आहे. चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यातील ६१ पंचायत समित्यापैकी २७ जागावर भाजपाचे, १८ ठिकाणी काँग्रेसचे सभापती निवडून आले आहेत. शिवसेनेला यवतमाळात ६ आणि अमरावतीत १ पंचायती समितीवर ताबा मिळविता आला. यासोबतच पाचही जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पाच सभापती निवडून आले. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पैकी ११ तर वर्धा जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यावर भाजपाने बाजी मारली आहे. गडचिरोली आणि अमरावतीत काँग्रेसला यश मिळाले. गडचिरोली जिल्ह्यातील १२ पैकी ५ आणि अमरावती जिल्ह्यातील १० पैकी ४ पंचायत समित्यावर कॉँग्रेसचे सभापती निवडून आले. यवतमाळात शिवसेनेने १६ पैकी ६ पंचायत समित्या तर काँग्रेसने ५ पंचायत समित्यावर ताबा मिळविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांपैकी ११ ठिकाणी भाजपाला सत्ता आली असून काँग्रेसला केवळ चार पंचायत समित्यांवर आपली सत्ता राखता आली आहे. पंचायत समितीच्या एकूण १२२ जागांपैकी भाजपाने ७० जागा मिळविल्या होत्या. त्या खालोखाल काँग्रेसला ३३ जागा राखता आल्या. वर्धा जिल्ह्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला. येथील आठही पंचायत समित्यावर ताबा मिळविण्यात भाजपाला यश आले. वर्धा पंचायत समितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. येथे भाजपाचे १३ आणि राकाँचे तीन असा १६ चा आकडा जुळविण्यात आला. यात सभापतिपद भाजपाला आणि उपसभापतिपद राकाँला देण्याच्या निर्णयावर एकमत होते. सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या महानंदा ताकसांडे या मते १६ घेऊन निवडून आल्या, तर उपसभापतिपदी मात्र अपक्ष उमेदवार सुभाष चांभारे यांनी १७ मते घेऊन विजय मिळविला. राष्ट्रवादीचे संदीप किटे यांना युती असतानाही ११ मतांवर समाधान मानावे लागले. सेलू येथे सहा भाजपा आणि सहा काँगे्रस तर हिंगणघाट येथे सात भाजपा आणि इतर सर्व पक्षांनी एकत्र येत सातचा आकडा जुळविला. यामध्ये काँग्रेस ३, राष्ट्रवादी २, सेना १ व इतर १ अशा सात जणांचा समावेश होता. या दोन्ही पंचायत समितीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यातही भाजपालाच कौल मिळाला. गडचिरोली जिल्ह्यातील बारा पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच पंचायत समित्यांवर काँग्रेसने कब्जा केला आहे. काँग्रेसने यश मिळविलेल्या पं.स. मध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, मुलचेरा यांचा समावेश आहे. तर भाजपने तीन पंचायत समित्यांवर वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये चामोर्शी, देसाईगंज व धानोरा पंचायत समितीचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सिरोंचा व एटापल्ली पंचायत समितीवर सभापती विराजमान केला. तर माजी आमदार दीपक आत्राम यांच्या नेतृत्वातील आदिवासी विद्यार्थी संघाने अहेरी पंचायत समितीवर सभापती, उपसभापती विराजमान केला आहे. आरमोरी येथे काँग्रेसने शिवसेनेला उपसभापती पद देऊन त्यांच्यासोबत आघाडी केली आहे. तर मुलचेरात काँग्रेसने सभापती पद आपल्याकडे ठेवत उपसभापती पद भाजपला दिले आहे. अमरावती जिल्ह्यात १० पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक चार सभापती विजयी झालेत. भाजपाला दोन, सेना व राकाँला प्रत्येकी १ सभापतीपद मिळाले. विशेष म्हणजे शह-काटशहाच्या राजकारणात अपक्षांना अच्छे दिन आलेत, तर दोन ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली.
विदर्भात भाजपाने मारले मैदान
By admin | Published: March 15, 2017 12:11 AM