खरिपाची चाहूल; पिकांचे नियोजन सुरूअकोला : यावर्षी पावसाळा वेळेवर आणि मुबलक असल्याचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांपुढे अनंत आर्थिक अडचनी असताना त्यांनी शेतमशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. पाऊस बऱ्यापैकी होणार असल्याने पिकांच्या नियोजनावरही भर देण्यात येत आहे.मागील दहा वर्षातील पावसाची आकडेवारी बघितल्यास तोकडी होती; पण गतवर्षी याच पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली; पण मध्येच खंड पडल्याने काही पिकांचे नुकसान झाले. तूर आणि कापूस या पिकाने मात्र शेतकऱ्यांना तारले. तुरीचे उत्पादन बंपर झाले, तर कापसाचा उताराही एकरी सरासरी ७ ते ८ क्ंिवटलच्या जवळपास होता. यावर्षी पुन्हा चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी व आवश्यक ती शेतीची कामे करण्यावर भर दिला आहे. विदर्भात उन्हाचा पारा चढताच आहे. या उन्हातही शेतकरी शेतात राबताना दिसत आहे. शेतात ट्रॅक्टरची घरघर दिसत असून, रोटावेटरने शेत सपाट केली जात आहेत. यावर्षी पिकांच्या नियोजनाबाबत शेतकरी दक्षता घेत आहे. यावर्षी तुरीने कंबरडे मोडल्याने शेतकरी तुरीच्या जागी पर्यायी पीक घेता येईल का, या विचारात आहे. सोयाबीन पिकाची पेरणी मात्र वाढणार आहे. चांगल्या पावसाच्या संकेतामुळे कापसाची पेरणीदेखील वाढू शकते. मूग,उडीद, ज्वारीची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी कापूस व काही ठिकाणी सोयाबीनमध्ये शेतकरी पारंपरिक पद्धतीने तुरीचे आंतरपीक घेत असतात. ते यावर्षीही घेणारच; पण त्यांची याबाबत द्विधा मनस्थिती आहे.दरम्यान, वऱ्हाडात पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत साडेचारशे कोटीचे पीक कर्ज वाटप झाले आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी कृषी विभागाच्यावतीने प्रबोधन केले जाणार आहे. शेतकरी जनजागृती आठवडा कृषी विभाग राबविणार आहे. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, यावरही भर दिला जात आहे. विभागात शेत मशागतींची कामे होत आहेत. खते, बियाण्यांचा साठा यावर्षी मुबलक आहे. पीक कर्ज वाटपावर भर दिला जात आहे. पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.- एस.आर. सरदार, विभागीय संयुक्त संचालक कृषी विभाग, अमरावती.
विदर्भात शेतमशागतीच्या कामावर भर!
By admin | Published: May 03, 2017 2:06 AM