लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यावर्षी समाधानकारक पावसाळ्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आतापासूनच पीक पेरणीचे नियोजन सुरू केले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी शेतकऱ्यांनी बीटी कापसाऐवजी देशी कापसावर लक्ष केंद्रित केले आहे; पण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे या वाणाचा तुटवडा असून, ४० क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे, तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे (महाबीज) केवळ ८८३ क्ंिवटल बियाणे उपलब्ध आहे. त्यामुळे देशी कापसासाठी शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे.मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कापसाचा बीजोत्पादन कार्यक्रम घेतला होता. बऱ्यापैकी देशी कापसाचे बियाणे निर्माण केले; पण यावर्षी देशी ज्वारी पेरणी या विशेष कार्यक्रमांतर्गत कृषी विभागाला काही बियाणे द्यावे लागले. त्यामुळे कृषी विद्यापीठाकडे ४० क्ंिवटल हे बियाणे उरले आहे. हे बियाणे येत्या २५ मे रोजी होणाऱ्या खरीपपूर्व मेळाव्यात विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. देशात सर्वत्र बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. तथापि, या बीटीला तोंड देण्यासाठी या कृषी विद्यापीठाने अनेक नवे कापसाचे वाण निर्माण केले आहे. पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसांत येणाऱ्या कापसाच्या वाणांचा यामध्ये समावेश आहे. मागील वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी देशी कापसाची पेरणी केली होती. असे असले, तरी अनेक शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही. यावर्षीही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे ४० क्ंिवटलच हे बियाणे उपलब्ध असून, महाबीजकडे केवळ ८८३ क्ंिवटल देशी कापसाचे बियाणे उपलब्ध आहे.शेतकऱ्यांचा देशी कापसाकडे वाढलेला कल बघता, यावर्षी ८८३ क्ंिवटल बियाणे उपलब्ध केले आहे. - रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बऱ्यापैकी ४० क्विंटल देशी कापसाचे बियाणे उपलब्ध केले आहे.- डॉ. दिलीप मानकर,संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि,अकोला.
विदर्भातील शेतकऱ्यांचा देशी कापसाकडे कल!
By admin | Published: May 24, 2017 2:21 AM