अकोला: कृषिक्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला असून, कृषिसमृद्धीसाठी आता उत्पादन व कापणीपश्चात यांत्रिकीकरणाची नितांत गरज असल्याने भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) यावर भर दिला आहे. विदर्भात या उपक्रमाची अंमलबजावणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे.आधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण शेतकर्यांना अधिक सोप्या भाषेत समजावे, यासाठी आयसीएआर (नवी दिल्ली) च्या निर्देशानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रक ल्प अंतर्गत अभियांत्रिकी तंत्रज्ञान, शेती अवजारे व तंत्रज्ञान यावर शेतकर्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. शेती व शेती उद्योगामध्ये ऊर्जा योजना अंतर्गत तंत्रज्ञान कृषियंत्रे व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मेळावे घेण्यात आले आहेत. शेतकर्यांना यंत्र हाताळताना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकीचे शास्त्रज्ञ कामाला लागले आहेत. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात याबाबत रविवारी विदर्भस्तरीय यांत्रिकीकरण मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी कृषी सहसंचालकांनी शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतीच्या यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. युरोपीय देशामध्ये ९५ टक्के शेती यांत्रिकी पद्धतीने केली जात असून, आपल्याकडेही भविष्यात संपूर्ण शेती यांत्रिकीकरणाद्वारे करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिक्षण विस्तार संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांनी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नसल्याने मेळाव्यातून होणारे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे शेतकर्यांनी अनुकरण केल्यास शेती करताना त्यांचा चांगला फायदा होईल, त्यासाठी कृषी विद्यापीठाच्यावतीने असे मेळावे घेत जात असल्याचे सांगितले. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी शेतीआधारित जोडधंदा निर्माण करता येत असल्याने या मेळाव्याचे विशेष महत्त्व असल्याचे ते म्हणाले.
विदर्भात शेतीत कापणीपश्चात यांत्रिकीकरणावर भर!
By admin | Published: March 22, 2016 2:11 AM