यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याला वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वशिम, बुलडाणा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपले. काही ठिकाणी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडले असून, फळबागांचे नुकसान झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दिग्रस, नेर, बाभूळगाव आणि महागाव तालुक्यात गारपिटीने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक आकाश काळ्या ढगांनी दाटून आले. काही वेळातच सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. पुसद शहरात तब्बल दीड तास वादळी पाऊस झाला. बोराच्या आकाराच्या गारा बरसल्या. पुसद तालुक्यातील माळपठार भागाला जोरदार तडाखा बसला. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा तडाखा बसला. विडूळ, मुळावा, पोफाळी या भागात तुरीच्या आकाराची १५ मिनिटे गारपीट झाली. उमरखेड शहरात वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. तर वृक्ष उन्मळल्याने नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गावरील वाहतूक दीड तास खोळंबली होती. नेर व बाभूळगाव तालुक्यातही गारपीट झाली. या पावसाने गहू, हरभरा, आंबा मोहोर, संत्रा, पालेभाज्यांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊसवाशिम / बुलडाणा : वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. वाशिम, मानोरा, मंगरूळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड या सहाही तालुक्यात पाऊस झाला. जवळपास एक तास झालेल्या या पावसाने फळबागांचे नुकसान झाले.बुलडाणा जिल्ह्यातही दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. लाखनवाडा येथे जिल्हा परिषद हायस्कूल व आश्रम शाळेवरील टीनपत्रे उडाली तसेच विजेचे खांब पडले. यामुळे गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
विदर्भाला गारपिटीचा तडाखा
By admin | Published: February 28, 2016 1:48 AM