योगेश बिडवई । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र विदर्भ, मराठवाड्यात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या व विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. कर्जमाफीत पाच एकरची अट असल्याने सरकारने येथील कोरडवाहू शेतकऱ्याला वाऱ्यावर तर सोडले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी दुष्काळ तर कधी मातीमोल भावामुळे यामुळे विदर्भ, मराठवाड्यात शेतमाल विक्रीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. कर्जबाजारीपणातून सर्वाधिक शेतकरी येथे आत्महत्या होतात. १० एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांची दोन एकर बागायती शेतीशी तुलना करता उत्पन्न तुटपुंजेच निघते. खत, बियाण्यांवर मोठा खर्च केल्यानंतरही अपेक्षित भावाअभावी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही. त्यातुलनेत बागायती शेतकरी ऊस, फळबागा करून लाखोंचे उत्पन्न मिळवू शकतो, असे मराठवाड्यातील कृषी अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी सांगितले. युनिक फाऊंडेशनमार्फत मराठवाड्यात केलेल्या अभ्यासाची आकडेवारीच त्यांनी सांगितली. ते म्हणाले, मराठवाड्यात साधारण ४० टक्के शेतकरी पाच एकरपर्यंत म्हणजे अल्पभूधारक आहेत. २० टक्के ५ ते १० एकर जमीन असलेले मध्यम शेतकरी आहेत. १० एकरपेक्षा जास्त जमीन असलेले १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे जवळपास ६० टक्के शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाही.कोरडवाहू १० एकर शेती असली तरी तोट्यात जाते, असे आम्हाला मराठवाड्यात असंख्य ठिकाणी आढळले. एकीकडे खते, बी-बियाणे यांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे दुष्काळ तर कधी शेतमालाचे घसरलेले भाव या चक्रात शेतकरी अडकतो, असे त्यांनी सांगितले.विदर्भातही पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने जास्त आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी सांगितले. १०० टक्के शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी केली. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. >२००८ मध्ये सात हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. आताचे बाजारभाव व महागाईची तुलना करता ३० हजार कोटींची कर्जमाफी खूप मोठी नाही. बँकांचे ‘स्केल आॅफ फायनान्स’ (प्रती एकरी कर्जवाटप) आता वाढले आहे. त्यामुळे ही रक्कम फुगली आहे. मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीवर टीका करणाऱ्यांनी त्यांचाच मार्ग अवलंबला आहे. - विजय जावंधिया, नेते, शेतकरी संघटना
विदर्भ, मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी वाऱ्यावर?
By admin | Published: June 05, 2017 5:00 AM