पुणे, दि. 24 - अनेक दिवस आतुरतेने प्रतिक्षा करायला लावणा-या मान्सूनने गेल्या आठवड्यात मराठवाडा व विदर्भावर कृपादृष्टी वळवली असली तरी या दोन्ही विभागातील सरासरी गाठण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 28 टक्के तर, मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला आहे.
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरात, राजस्थान, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, छत्तीसगडसह देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ यामुळे जवळपास २० ते २२ दिवस पावसाची प्रतिक्षा करणाºया मराठवाडा व विदर्भात १७ ते २३ आॅगस्ट दरम्यान जोरदार पाऊस झाला़ या आठवड्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा १६८ टक्के, विदर्भात सरासरीपेक्षा २ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात १०१ टक्के पाऊस झाला़ याच काळात कोकणात मात्र सरासरीपेक्षा २ टक्के कमी पाऊस झाला.
१ जून ते २३ आॅगस्ट दरम्यान देशाच्या ३६ हवामान विभागापैकी केवळ ५ विभागात अधिक पाऊस झाला असून १० विभागात २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला़ २१ विभागात सर्वसाधारण पाऊस झाला आहे. पश्चिम मध्य प्रदेश (-२२ टक्के), पूर्व मध्य प्रदेश (-२७ टक्के), पूर्व उत्तर प्रदेश (-२० टक्के), पश्चिम उत्तर प्रदेश (-३६ टक्के), चंदीगड (-२९ टक्के), अंतर्गत कर्नाटक (-२० टक्के) आणि दक्षिण कर्नाटक (-२७ टक्के) कमी पाऊस झाला आहे़ याशिवाय पंजाब (-१८), छत्तीसगड (-१२), तेलंगणा (-१२), ओडिशा (-७), हिमाचल प्रदेश (-९), उत्तरांखड (-४) या विभागातही कमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकणात गणेशोत्सवात पाऊस
पुढील आठवड्यात कमी पावसाची शक्यता आहे़ २४ ते ३० आॅगस्ट या आठवड्यात कोकणात गणेशोत्सवाच्या काळात २६ ते २८ हे तीन दिवस अनेक ठिकाणी जोरदार पावसाचे राहण्याची शक्यता आहे़ मध्य महाराष्ट्रात २६, २७ व २८ आॅगस्टला अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ मराठवाड्यात २६ व २७ आॅगस्टला अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़ विदर्भात २५ आॅगस्टला जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला असून पुढील चार दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़
दर वर्षी दोन-तीन वेळा कोरडा काळ असतो. यंदा मध्यंतरी दोन आठवड्याहून अधिक काळ पाऊस नव्हता. आता पुन्हा दोन-तीन दिवस कोरडे जातील. मात्र, २५ आॅगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल. त्यानंतर २६ ते २८ आॅगस्टदरम्यान पुन्हा पाऊस सक्रिय होईल. मुसळधार पाऊस झाला नाही, तरी राज्यातील बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी असेल. त्यानंतर पुन्हा पावसाचे खंड पडेल. नंतर २ आणि ३ सप्टेंबरला पुन्हा पाऊस सक्रिय होईल. -पी. के. नंदनकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, हवामान विभाग
राज्यात १ जून ते २३ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस (मिमी)