मुंबई - राजधानी मुंबईला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने मुंबई विभागाचा आता झपाट्याने विकास होणार असं चित्र असताना आता विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद आणि विधान परिषदेतील सभागृह नेतेपदही मुंबईकडे गेले आहे. विधान परिषद विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकर आणि विधान परिषद सभागृहनेते सुभाष देसाई यांच्या रुपाने मुंबईला तिसरे महत्त्वाचे पद मिळाले आहे. त्या तुलनेत मराठवाडा उपेक्षीत राहतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सत्ताकेंद्र मुंबईकडे एकवटल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडे सत्तेच्या चाव्या आल्यास, वजनदार खाते किंवा पदं मुंबई विभागाला मिळणार अशी शक्यता व्यक्त होत होती. याआधी जेव्हा जेव्हा शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली, त्यावेळी शिवसेनेकडून मंत्रीपदांसाठी मुंबईलाच झुकते माप देण्यात आले आहे. युतीच्या काळातही मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या रुपाने मुंबईला मुख्यमंत्रीपद मिळाले होते.
मराठवाड्याच्या तुलनेत विदर्भाला देखील फायदा झाला आहे. विधानसभेचे विरोधीपनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी तर विधानसभेच्या अध्यक्षपदी विदर्भातील नाना पटोले यांची निवड झाली आहे.
दरम्यान मराठवाड्याच्या वाट्याला काय येणार याची अद्याप उकल होऊ शकली नाही. आघाडीच्या काळात मराठवाड्याला दिवंगत विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या रुपाने अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र महाविकास आघाडीच्या काळात मराठवाड्याच्या वाट्याला फारसं काही आल्याचे दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाडा उपेक्षीत राहतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.