एका सहायक संचालकाकडे ११ जिल्ह्यांचे कामचंद्रशेखर बोबडे - नागपूरअल्पबचतीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करणाऱ्या अल्पबचत विभागाची विदर्भात दयनीय अवस्था आहे. विभागाच्या एका सहायक संचालकाकडून ११ जिल्ह्यांचा कारभार रेटून नेला जात आहे. विदर्भातील नागपूर विभागात सहा आणि अमरावती विभागात पाच असे ११ जिल्हे आहेत. नागपूर आणि अमरावतीमध्ये अल्पबचत संचालनालयाची स्वतंत्र विभागीय कार्यालये आहेत. मात्र सध्या एकाच अधिकाऱ्याकडे दोन्ही विभागाचे काम आहे. नागपूर विभागाचे सहायक संचालकपद रिक्त आहे. अमरावतीच्या सहायक संचालकांकडे नागपूरचा अतिरिक्त कार्यभार आहे.अर्थखात्याच्या अखत्यारित येणाऱ्या अल्पबचत विभागाने केव्हातरी सुवर्णकाळ अनुभवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात २५ अल्पबचत अधिकारी ६ सहायक संचालक आणि एक संचालक असा अधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. प्रत्येक जिल्ह्यातून अल्पबचत योजनेच्या माध्यमातून शेकडो कोटींची गुंतवणूक केली जात होती. २००४-२००५ या वर्षात नागपूर विभागाची गुंतवणूक ही ५८० कोटींची होती. मात्र त्यानंतर या विभागाला उतरती कळा सुरू झाली. कर्मचारी सेवानिवृत्त झाले. पण भरती झाली नाही. सध्या नागपूर विभागात तीन अल्पबचत अधिकारी आणि एक सहायक संचालक आहेत. अमरावती विभागात दोनच अधिकारी आहेत. लिपिकही नाही.नागपूर विभागाचे कार्यालय एका पडक्या इमारतीत आहे. पावसाळ्यात ही इमारत गळते. अधिकाऱ्यांसाठी वाहन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा विभाग बंद होणार अशी चर्चा आहे. मात्र तरीही येथे होणारी गुंतवणूक दखलपात्र आहे. अल्पबचतची मासिक बचत योजना ग्रामीण भागात अजूनही लोकप्रिय आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असून अभिकर्त्यांच्या कमिशनमध्येही घट करण्यात आली आहे.
विदर्भात अधिकाऱ्यांची ‘बचत’
By admin | Published: August 10, 2014 1:25 AM