पुणे : विदर्भात मान्सून सक्रीय झाल्याने गेल्या २४ तासांत विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. देवरी येथे १०० मिमी पावसाची नोंद झाली. कोकणात मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा पट्टा झारखंड व लगतच्या भागांवर आल्याने विदर्भात मान्सूनची अनुकुल झाला आहे.. गेल्या २४ तासांत विदर्भातील कोर्ची येथे ७०, भंडारा, कुरखेडा, लाखनी येथे ५०, अर्जुनी (मोरगाव), साकोली येथे ४० मिमी पाऊस झाला. तर भिरा, कर्जत, राजापूर, गोंदिया येथे ३०, रोहा, आमगाव, देसाईगंज येथे २०, चिपळूण, लांजा, माथेरान, पेण, भामरागड, ब्रम्हपुरी, गडचिरोली, नागपूर, सिंदेवाही, उमरेड, गगनबावडा, महाबळेश्वर येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. पुढील २४ तासांत कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची रिपरिप सुरू होती. गगनबावडा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यांत शेतीस उपयुक्त असा दमदार पाऊस झाला. राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कुंभी, कोदे धरणक्षेत्रांत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. कार्बनडाय आॅक्साईडच्या व्यस्त प्रमाणामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढत असून तापमानही वाढत आहे. भविष्यात चक्रीवादळांची समस्या आणखी त्रासदायक बनेल, असे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी जळगावमध्ये व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शनिवारी जैन हिल्सवर शेती, पाणी व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर चर्चासत्र झाले. गेल्या १४४ वर्षांत देशात २४ वर्षे दुष्काळी स्थिती होती. १९ वर्षे चांगला पाऊस, १०१ वर्षे सामान्य पाऊस होता, असेही केळकर यांनी सांगितले.
विदर्भात पाऊस ! राज्यात प्रतीक्षा : कोकणात मात्र प्रमाण कमी
By admin | Published: July 12, 2015 2:44 AM