अकोला, दि. १६- निवडणुकीचे परिणाम काहीही येवोत, चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आगामी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर लढू, त्यासाठी विदर्भ राज्य आघाडी पक्षाचे उमेदवार सर्वत्र उभे राहतील, असे माजी महाधिवक्ता, स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ उभारणारे अँड. श्रीहरी अणे यांनी येथे सांगितले. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर निवडणूक लढण्याच्या पूर्वतयारी बैठकीनंतर अणे म्हणाले, वेगळ्या विदर्भासाठी लढा देणार्यांचे ध्येय एक असले तरी मार्ग वेगवेगळे आहेत. हा लढा केवळ चळवळीच्या माध्यमातूनच लढला जावा, या मताचे काही तर त्यासाठी राजकीय चळवळ उभारावी, या मताचेही काही आहेत. समान मागणी असणारे एकमेकांच्या विरोधात असू शकत नाहीत, त्यामुळे इतरांचा आम्हाला किंवा आमचा त्यांना पाठिंबा गृहितच आहे.वेगळ्या विदर्भाला अनुकूल असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. मात्र प्रत्यक्षात काहीच केले नाही. सोबतच भाजपानेही दिलेला शब्द पाळला असता, तर त्यांच्याविरोधात जाण्याची गरजच उरली नसती. भाजपा आणि काँग्रेस वेगळ्या विदर्भाचे क्रमांक एकचे शत्रू असल्याचेही अणे म्हणाले. विदर्भातील सर्वच मोठय़ा नेत्यांचे वैयक्तिकरीत्या मागणीला सर्मथन आहे; मात्र पक्षाच्या पुढे ते जात नाही, त्यांच्या र्मयादा आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांचाच दबाव वाढविण्यासाठी, त्यांची संख्या दाखविण्यासाठी निवडणूक लढणे, हाच पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले. नीतेश राणे यांचे आभारच..नीतेश राणे यांनी धमक्या देणे, हा त्यांचा वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही; मात्र त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढण्याचे म्हटले. त्यातून जनमताचा कौल कळेल, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यांच्या मुद्यानुसार निवडणूक लढण्याची तयारी पक्की झाली. त्यामुळे त्यांचा आभारीच आहे, असेही अणे म्हणाले.विजयाच्या निकषावरच तिकीटनिवडणुकीसाठी उमेदवारी देताना विजयी होण्याचे निकष तपासले जातील. नवीन, धोरणी उमेदवारांना संधी दिली जाईल. इतर पक्षांनी नाकारलेल्यांना तिकीट मिळणार नाही. निवडणुकीसाठी पैसा लागतो. तो आमच्याकडे नाही. लोकांनी मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विदर्भ राज्य आघाडी निवडणुकीच्या रिंगणात!
By admin | Published: October 17, 2016 2:43 AM