अकोला: विदर्भातील कापूस हे नगदी पीक आहे; परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग चार ते पाच वर्षांपासून उत्पादन घटले असल्याने शेतकरी या पिकाच्या बाबतीत साशंक असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापसाच्या व्यवस्थापनावर भर दिला असून, येत्या खरीप हंगामात अतिउच्च घनता पद्धतीचा वापर वाढण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अतिघनता लागवड करण्यासाठी यावर्षी शासनही लक्ष देणार आहे.विदर्भात कापसाचे क्षेत्र जवळपास १५ लाख हेक्टरच्या वर आहे. तथापि, अलीकडे हे क्षेत्र कमी होत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाचे क्षेत्र कायम ठेवण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून दक्षता घेतली जात आहे. शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाची एकेएच 0८१ व एकेएच 0७ या अति उच्च घनता लागवड करावी, यासाठी या कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकर्यांच्या शेतावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे; परंतु असे असले तरी या दोन जातीचे बियाणे शेतकर्यांना कितपत उपलब्ध होईल, यावर सर्व अवलंबून आहे. कापूस पिकाच्या अतिउच्च घनता लागवडीसाठी शासनाने यावर्षी लक्ष केंद्रित केले असून, यासंदर्भात लवकरच कृषी विद्यापीठ, कृषी विभागाला आदेश दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. या बाबत कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाकडून कापूस पिकाचे आधुनिक व्यवस्थापन या विषयावर बुधवारी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यामध्ये कापूस विकास संचालनालय नागपूरचा सहभाग आहे. कापूस विदर्भातील नगदी पीक असल्याने कापूस तंत्रज्ञानामध्ये विविध पद्धतींचा अवंलब करता येणे शक्य आहे. अधिक उत्पादनाकरिता शिफारस केलेल्या कापसाच्या जाती आणि सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास उत्पादनात निश्चित भर पडून नफा मिळवता येतो. अति घनता लागवडीचा अवलंब केल्यास हेक्टरी झाडांची संख्या वाढ होते, हे विशेष.
विदर्भात कापूस पिकाच्या व्यवस्थापनावर भर!
By admin | Published: March 26, 2016 2:12 AM