यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याची मशाल आयुष्यभर धगधगत ठेवणारे लढवय्ये माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे हृदयाघाताने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने एका संघर्षयुगाची अखेर झाली.शुक्रवारी रात्री त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे ३च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी माजी आमदार विजयाताई धोटे, क्रांती व ज्वाला या दोन कन्या आणि जावई आहेत. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १ वाजता अमरावती मार्गावरील पिंपरी-लासीना (ता. यवतमाळ) येथील शेतात अंत्यसंस्कार केले जातील. तत्पूर्वी यवतमाळ शहरातील मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात येईल. (प्रतिनिधी)लढवय्ये व्यक्तिमत्त्व हरपलेशेती आणि प्रादेशिक विकासाच्या समतोलाबाबत आग्रही भूमिका मांडणारे लढवय्ये आणि वादळी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. राज्याचा विकास प्रादेशिक असमतोल ठेवून साधला जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक प्रदेशाला विकासाच्या मुख्य धारेत आणले पाहिजे, हे त्यांचे मतच नव्हते तर ते त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक दायित्व मानले होते. शेतकऱ्यांच्या प्रगतीबरोबरच विदर्भाच्या विकासाबाबत ते कमालीचे आग्रही होते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
विदर्भाची धगधगती ‘मशाल’ निमाली!
By admin | Published: February 19, 2017 5:23 AM