- ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३ व ४ ऑक्टोबर रोजी विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात भरविण्यात येणार आहे. सोबतच अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोध करणार असून ५ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
दोन दिवसाच्या विदर्भाच्या विधानसभेमध्ये विदर्भाच्या विकासाचे मॉडेल सादर करण्यात येणार आहे. विदर्भ राज्याच्या फायद्याचा अर्थसंकल्प मांडून विदर्भ राज्य कसे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, हे सांगण्यात येणार आहे. सोबतच विदर्भात औद्योगिकीकरण व रोजगार कसे वाढेल, शेतकºयांच्या आत्महत्या, नक्षलवाद, कुपोषण कसे संपेल, ११ ही जिल्ह्यांचा संतुलित विकास कसा होईल, विदर्भातील विजेचे लोडशेडिंग संपवून विजेचे दर निम्म्यावर कसे आणल्या जातील याचाही निर्णय या विधानसभेत होईल. विदर्भ राज्य हे देशातील नंबर एकचे प्रगतीशील राज्य कसे होऊ शकते हेही या विधानसभेत मांडल्या जाईल, असे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्याची विधानसभा ५ डिसेंबरला नागपूरला भरेल, त्या विधानसभेला विदर्भ राज्य आंदोलन समिती विरोध करणार आहे. यासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.