ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 29 - कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचे 5 डबे पुन्हा रुळावर आणण्यात यश आले आहे. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. दरम्यान, सीएसटीकडे जाणारी वाहतूक सुस्थितीत सुरू करण्यात आली आहे. या अपघातामुळे ऐन कामावर जाण्याच्यावेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या या रोजच्या रडारडीवर प्रवासी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
अपघातानंतर अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. शिवाय अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या दुस-या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे वेळापत्रकही पूर्णतः कोलमडले आहे. मुंबई-पुणे वाहतूक सेवा तर पूर्णपणे कोलमडली आहे.
दरम्यान, लोकलचे पाच डबे घसल्याने रेल्वे ट्रॅकचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय लोकलच्या धडकेमुळे विजेच्या खांबांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केडीएमसीच्या एकूण 17 अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. शिवाय अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे.
LIVE अपडेट्स -
मध्य रेल्वेवरील सीएसटीकडे जाणारा मार्ग सुस्थितीत असल्याची माहिती
अप मार्ग सुरळीत सुरू झाला असून डाऊन मार्गावरील वाहतूक संध्याकाळी 6 वाजण्याच्या आत सुरू होण्याची शक्यता
डाऊन मार्गावरील विजेच्या दोन खांबांचे नुकसान झाल्याने ओव्हर हेड वायरच्या कामाला अडथळा येत आहे, मात्र बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती
घसलेले सर्व पाच डबे रेल्वे रुळावर आणण्यात यश, वाहतूक मात्र अजूनही विस्कळीत. शिवाय अपघातात रेल्वे ट्रॅकचे 150 मीटरपर्यंत नुकसान झाले आहे
मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. कल्याणासाठी अंबरनाथहून आधी 50 रुपये सीट भाडे घेण्यात आले यानंतर 150 रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यात हस्तक्षेप करूनही उपयोग झालेला नाही
उल्हासनगर येथे परिवहन सेवा नसल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत, तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.
सीएसटीकडे सोडण्यात आलेल्या लोकल
बदलापूर -सीएसटी विशेष लोकल 9.35 वाजता रवाना
अंबरनाथ- सीएसटी लोकल 9.23 वाजता रवाना
लांब पल्याच्या 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर डाऊन मार्गावरील 11, अप मार्गावरील 4 गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत.
नेहमीच लोकल सेवा कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने विस्कळीत होत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारीदेखील वांद्रे -माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.
लोकल धडकल्याने विजेच्या खांबाचे नुकसान
हेल्पलाईन क्रमांक
सीएसटी 022-2269040
दादर 022-22414836
पुणे 020-26105130/26111539
ठाणे 022-25334840
कल्याण0251-2311499
https://www.dailymotion.com/video/x844mrz