- ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 30 - भाजपा आमदाराने मोठ्या उत्साहाने आपल्या पत्नीला गिफ्ट म्हणून लँबॉर्गिनी कार दिली. इतकी महागडी कार मिळाल्यावर पत्नीदेखील खूश झाली. आता गाडी समोर उभी असताना तिला चालवण्याची इच्छा तर होणारच...पण उत्साहाच्या भरात कार चालवताना गाडीवरचा ताबा सुटला आणि पत्नीने नवी कोरी, चकचकीत लँबॉर्गिनी नेऊन रिक्षाला ठोकली आणि सगळा उत्साह मावळला. ही घटना 27 ऑगस्टची आहे. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली पत्नी सुमन यांना सरप्राइज म्हणून तब्ब्ल 5.5 कोटी किंमतीची लँबॉर्गिनी कार गिफ्ट म्हणून दिली होती. आपण आपल्या पत्नीला इतकी महागडी कार गिफ्ट म्हणून दिली याची घोषणाही आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मिडियावरुन केली. सुमन यांनी सेव्हन इलेव्हन अकॅडमीमधून कार बाहेर काढली आणि फेरफटका मारायला निघाल्या. पण गेटच्या बाहेर येताच त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि समोरच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षाला जाऊन कार धडकली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली असून त्याचा व्हिडीयोही व्हायरल झाला आहे.
आपली रिक्षा ठोकल्याचं पाहून रिक्षाचालकही धावत आला. बाहेर सुरु असलेला गोंधळ पाहून सुमन यांनी गाडीतच बसणं सुरक्षित असल्याचं समजलं. त्यानंतर नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारची अजून आरटीओमध्ये नोंदणीदेखील झालेली नाही. अपघातानंतर नरेंद्र मेहता यांनी रिक्षाचालकाला लगेच नुकसानभरपाई दिली. त्यामुळे नवघर पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार झालेली नाही. कार सध्या शाळेच्या आवारातच उभी करण्यात आली आहे.
या अपघाताचा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नरेंद्र मेहतना यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देत 'माझ्या पत्नीला 18 वर्ष गाडी चालवण्याचा अनुभव आहे, तिने याआधीही ऑडीसारख्या गाड्या चालवल्या आहेत असं सांगितलं आहे. कारचा ऑटोला फक्त स्पर्श झाला असून काही नुकसान झालेलं नाही. कारचं नुकसान झालं असून रस्त्यावरील मेकॅनिक दुरुस्त करु शकत नाहीत. कार सध्या शाळेच्या आवारात उभी आहे', असं सांगितलं आहे.