आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - मराठी प्रतिष्ठानतर्फे मेहरूण तलावाच्या काठावर रविवारी सायंकाळी आयोजित भजी महोत्सवाच्यानिमित्ताने माजी मंत्री सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे हे जळगाव जिल्हयाच्या राजकारणातील दोन दिग्गज तब्बल सात वर्षांनी एका व्यासपीठावर आले. इतकेच नव्हे तर एकमेकांशी गप्पा मारत एकमेकांना भजी देखील खाऊ घातली.
मराठी प्रतिष्ठानतर्फे रविवार दि.९ रोजी मेहरूण तलावाच्या काठावर भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी माजी खासदार ईश्वरलाल जैन हे पाच वाजेच्या सुमारास दाखल झाले. तर मोहाडी रोडवरील मराठी प्रतिष्ठानचाच ‘बोगनवेल लावू या’ हा कार्यक्रम आटोपून भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सव्वापाच वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव काठी भजी महोत्सवासाठी दाखल झाले.
भाऊंना आवडतात मिरचीची भजी
तलावाकाठीच मंडप टाकून भजी बनविली जात होती. तर तलावाच्या काठाने टेबल-खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका ठिकाणी खडसे विराजमान झाले. ईश्वरलाल जैन देखील त्यांच्या शेजारी येऊन बसले. आयोजकांनी भजी मागविण्यासाठी खडसे यांना कोणती भजी हवीत? अशी विचारणा केली. त्यावर खडसेंनी ‘नाथाभाऊ म्हटल्यावर मिरचीचीच भजी लागणार’असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पसरला. यावेळी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हा सरकारी वकील अॅड.केतन ढाके, तसेच आयोजक अॅड.जमील देशपांडे, विजयकुमार वाणी, प्रमोद बºहाटे, अनिल कांकरिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चार-पाच प्रकारच्या भजींचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
५ कोटी काय पण २ लाख रूपये देखील मिळणे मुश्कील
यावेळी महापौर लढ्ढा यांनी मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणासाठी व पर्यटनस्थळ म्हणून विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून ‘डीपीडीसी’तून निधी देण्याची मागणी खडसेंकडे केली. त्यावर शासनाने सर्वच विकास कामांच्या निधीत ३० टक्के कपात केलेली असल्याने ५ कोटी काय पण २ लाख रूपये देखील मिळणे मुश्कील असल्याचे खडसेंनी सांगितले. तसेच कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शक्य होईल तेवढे काम करून घेण्याचा सल्लाही दिला.
खडसेंनी केली सुरेशदादांच्या तब्येतीची विचारपूस
सायंकाळी ५वाजून २५ मिनिटांनी सुरेशदादांचे महोत्सवस्थळी आगमन झाले. खडसेंच्या शेजारच्या खुर्चीवर दादा विराजमान होत असतानाच खडसे यांनी ‘या दादा’ असे म्हणत त्यांचे स्वागत केले. तसेच ‘तब्येत कशी आहे?’ अशी विचारणाही सुरेशदादांना केली. त्यानंतर उपस्थितांमध्ये भजी, पाऊस, या विषयावर गप्पा रंगल्या. यावेळी आयोजकांनी या भजी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्णातील दोन दिग्गज नेते एकत्र व्यासपीठावर आल्याचा आनंद व्यक्त केला. तेव्हा उपस्थित छायाचित्रकारांनी ७ वर्षांपूर्वी मेहरूण तलावाकाठीच ‘फोटोग्राफर्स-डे’निमित्त प्रेस फोटोग्राफर्स फाऊंडेशनतर्फे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात दादा व खडसे एकत्र आले होते, याची आठवण करून दिली. यावेळी खडसे व दादांनी एकमेकांचे फोटो काढून फोटोग्राफी-डे साजरा केल्याच्या आठवणीला उजाळा दिला.
एकेमकांना खाऊ घातली भजी
यावेळी उपस्थितांच्या आग्रहावरून सुरेशदादांनी खडसेंना बटाटाभजे खाऊ घातले. तर खडसेंनी मिरचीभजे सुरेशदादांना खाऊ घातले. यावेळी देखील मिरची भजे खाऊ घालण्यावरून उपस्थितांमध्ये हास्यविनोद झाला.
खडसेंच्या फार्महाऊसवरील खजूरचा आस्वाद
खडसेंनी त्यांच्यासोबत त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवरील सीडलेस बेदाणे व खजूर याचा ‘वानोळा’ आणला होता. त्यांनी तो कार्यकर्त्याकडून मागवून घेतला. सुरेशदादा व उपस्थितांना तो दिला. सुरेशदादा, ईश्वरलाल जैन यांच्यासह सर्वच मान्यवरांनी त्याचा आस्वाद घेतला. खडसेंनी या खजूर व सीडलेस बेदाण्याचे वैशिष्ट्य सुरेशदादांना सांगितले. थोडावेळ चर्चा झाल्यावर खडसे रवाना झाले. सुरेशदादा काही वेळ थांबले. महापौरांनी त्यांना मेहरूण तलावाच्या सुशोभिकरण कामाची माहिती दिली.
पाहा व्हिडीओ-
https://www.dailymotion.com/video/x84578v