अनंत जाधव
सावंतवाडी, दि. 7 - अंदमान येथील समुद्रकिनारी मान्सून धडकल्यानंतर तो हळूहळू सरकत सरकत केरळ तसेच गोव्याच्या मार्गे कोकणात दाखल होतो आणि त्यानंतर तो पूर्ण महाराष्ट्रात बरसतो. सध्या अंदमान समुद्रकिनारी मान्सून येऊन धडकला असून, तो कोणत्याही क्षणी पुढे सरकून महाराष्ट्रात डेरेदाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदमान समुद्रकिनारी मच्छीमार बांधवांची संख्या रोडवली असल्याचे दिसून येत आहे. तसेच मोठ मोठे बार्ज ही समुद्रकिनारी येऊन थांबले आहेत. सोमवारी दिवसभर अंदमानात ढगांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामुळे अंदमानमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचे मच्छीमारानी शिक्कामोर्तब केले. अंदमानात जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले होते. पण मान्सून सक्रिय झाल्याने पर्यटक ही अंदमानातून काढता पाय घेऊ लागले आहेत. अंदमान येथील मच्छीमार तसेच क्रूझ चालक यांनी मान्सून येण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी अनुभवली होती. तब्बल चार दिवस पाऊस कोसळला. त्यामुळे सुरुवातीला नागरिकांना मान्सून सक्रिय झाल्याचा आभास निर्माण झाला होता. पण त्यानंतर आठवडाभर अंदमानमध्ये कडक उन्ह पसरलं होतं. त्यामुळे पडलेल्या या पावसाच्या पूर्व सरी होत्या, असे मच्छीमार रवी यांनी सांगितले. पुणे वेध शाळेने ही मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.