ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३० - ‘घर घेण्यासाठी आम्ही सर्व दागिने विकले होते. सौभाग्यलंकार असलेले मंगळसुत्र तेवढे आम्ही ठेवले होते. मात्र, ते ही चोरट्यांनी हिसकावून नेले होते. तेव्हा खुप वाईट वाटले. परंतु पोलिसांनी चोरट्यांना शोधून माझे मंगळसूत्र मला परत मिळवून दिले. पोलिसांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. मला खुप आनंद झाला आहे.’ डोळ्यांमधील अश्रुंना वाट मोकळी करुन देत सुवर्णा घाटे या गृहीणीने आपल्या भावना मांडल्या. निमित्त होते पोलिसांनी आयोजित केलेल्या मुद्देमाल पुन:प्रदान कार्यक्रमाचे.
गेल्या दोन वर्षांतील चोरीला गेलेल्या गुन्ह्यांमधील चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने फिर्यादींना परत देण्यात आला. राज्याचे अतिरीक्त सचिव (गृह) के. पी. बक्षी आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात हा ऐवज देण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह पोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, शशिकांत शिंदे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, डॉ. बसवराज तेली, पी. आर. पाटील, डॉ. प्रविण मुंढे, प्रविण डहाणे, कल्पना बारवकर, श्रीकांत पाठक, दीपक साकोरे, अरविंद चावरीया उपस्थित होते.
यावेळी बोलताना बक्षी म्हणाले की, ‘दागिन्यांशी सर्वांचेच भावनिक नाते जुळलेले असते. ते केवळ आर्थिक नुकसान नसते, तर भावनिक नुकसानही होते. ज्या लोकांना त्यांचा मुद्देमाल परत मिळाला आहे. त्यांच्या आनंदात आम्ही सर्वजण सामील आहोत. अशा कार्यक्रमांमधून मिळणा-या प्रतिक्रियांमधून लोकांचे पोलिसांवरचे प्रेम अथवा राग समजत असतो. पुणे पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पुणे पोलिसांकडून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण खुप जास्त आहे. आता आम्ही शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी खुप प्रयत्न करीत आहोत. 1 जानेवारी 2015 च्या तुलतेन 30 जून 2016 पर्यंत हे प्रमाण 54 टक्क्यांवर आले आहे. राज्यातील सर्व पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य दिले असून हे प्रमाण मार्च 2017 पर्यंत 65 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आव्हान आम्ही स्विकारले आहे.’
शुक्ला म्हणाल्या, ‘पोलिसांवर नागरिकांनी विश्वास ठेवावा. त्यांच्या सेवेसाठी पोलीस 24 तास उपलब्ध आहेत. आपले दागिने आणि स्वत:ला सांभाळा. पोलिसांच्या कामामध्ये सहयोग द्या. जेणेकरुन पोलिसांना गुन्हेगारांवर वचक ठेवणे शक्य होईल.’ या कार्यक्रमासाठी नियंत्रण कक्षाच्या पोलीस निरीक्षक रेहाना शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना वरिष्ठ निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी केले.
घरामधून जीना उतरत असताना आलेल्या चोरट्याने माझ्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली होती. विशेष म्हणजे हा चोरटा कडक इस्त्रीचे कपडे घालून आलेला होता. या गो-या गोमट्या चोरट्याबाबत संशयही आला नव्हता. मी हा ऐवज परत मिळेल याची आशा सोडली होती. पोलिसांनी तो परत मिळवून दिला त्याचे खुप समाधान वाटते आहे. पोलिसांना धन्यवाद.
- सुधा यशवंत नाईक, (वय 70, रा. नारायण पेठ)
साधारणपणे नोव्हेंबर 2015 मध्ये नातीला सकाळी शाळेच्या व्हॅन जवळ सोडायला घराबाहेर आले होते. तिला सोडून घरामध्ये जात असताना पाठोपाठ एकजण गेटमधून आतमध्ये घुसला. काही कळायच्या आतच त्याने मला धक्का देत खाली पाडले. माझ्या डोक्याला खोप पडली होती. ही जखम भरायला खुप दिवस लागले. गेलेली वस्तू परत मिळेल असे काही वाटले नव्हते. पण पोलिसांमुळे मिळाली. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.
- विजया श्रीकांत गोखले (वय 82, रा. सहकारनगर)