ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 25 - कोपर्डी येथील युवतीवर अमानूषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ फासावर लटकवा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील तमाम सकल मराठा समाजाने आज आयोजित अभूतपूर्व मूकमोर्चात लाखोच्या संख्येने एकजूट दाखविली. ऐतिहासिक पद्धतीने झालेल्या या मोर्चामध्ये विशेषत: महिलांची लक्षणिय उपस्थिती दिसून आली.कोपर्डी (जि.अहमदनगर) येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासोबतच सकल मराठा समाज बांधवांनी अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा, स्वामिनाथन आयोग लागू करणे, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे, यासह इतरही शासनस्तरावरून दुर्लक्षित मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविले. अत्यंत शांत व संयमाची परिचिती देणाऱ्या या मोर्चास स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नियोजित वेळेनुसार दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. स्थानिक शिवाजी चौकात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या १२ युवतींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण केला. तेथून थेट हा मोर्चा जिल्हा क्रीडांगणावर पोहचला. लाखोच्या संख्येत आलेल्या मोर्चेकऱ्यांनी यावेळी पावसाची देखील कुठलीच तमा न बाळगता आपला नि:शब्द हुंकार व्यक्त केला. ६ युवतींनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. तसेच प्रचंड जनसमुदायासमोर १२ पानी निवेदनाचे वाचन करण्यात आले. ...................................महिला शक्तीचे घडले दर्शनसकल मराठा समाजाने वाशिममध्ये काढलेल्या मूकमोर्चात समाजातील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे धो-धो पाऊस सुरू असताना आणि जिल्हा क्रीडांगणावर सर्वत्र चिखल साचलेला असतानाही महिलांनी त्याठिकाणी तब्बल एक ते दीड तास शांततेत उपस्थिती दर्शविली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या संख्येचा हा आकडा २ लाखापेक्षा अधिक होता. ...................पीडित युवतीसोबतच शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजलीजिल्हा क्रीडांगणावर मोर्चा पोहचल्यानंतर प्रारंभी कोपर्डी येथील त्या पिडित युवतीसोबतच समाजबांधवांनी उरी येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लाखोचा जनसमुदाय दोन मिनीटासाठी स्तब्ध झाला होता.
VIDEO- सकल मराठा समाजाने दाखविली एकजूट!
By admin | Published: September 25, 2016 6:34 PM