इंदूमती गणेश/आदित्य वेल्हाळ/ ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 2 - सप्तरंगी फुलांची आरास, इंद्रधनुषी विद्यूत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर, मराठमोळ््या वाद्यांना लाभलेली दाक्षिणात्य संगीताची साथ, पवित्रानुभूती देणारे मंत्रोच्चार, तीन पीठाधीशांचे आर्शिवचन, अंबा माता की जय चा गजर, फुलांचा अखंड वर्षाव आणि महाआरतीने करवीर निवासिनी जगतजननी अंबाबाईला सोमवारी सुवर्णपालखी अर्पण करण्यात आली. या तब्बल २६ किलो सुवर्णपालखीेचा अर्पण सोहळी याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती.
दोन वर्षांपूर्वी संकल्पीत करण्यात आलेल्या या सुवर्णपालखीला देवीच्या चरणी अर्पण करण्यासाठी सुरु असलेल्या जय्यत तयारी सोमवारी अंतिम रुप घेतले. धार्मिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान लाभलेल्या भवानी मंडपात साकारलेल्या आणि डोळ््याचे पारणे फेडणाºया रंगमंचावर हा सोहळा साकारला. कांचीपूरम येथील श्री कांची कामकोटी पीठाचे पिठाधीश जयेंद्र सरस्वती स्वामीजी, करवीर पीठाचे शंकराचार्य प.प. श्री विद्यानृसिंहभारती, राघवेंद्र स्वामी मठाचे पीठाधीश प.पु. सुबुधेंद्रतीर्थ स्वामीजी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक, शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार, अरुंधती महाडीक, भरत ओसवाल उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पीठाधीशांच्या हस्ते सुवर्ण पालखी व दस्तऐवज देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमाची सुरवात पवित्र मंत्रोच्चाराने झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, प्रत्येक चांगल्या कामातच लोकसहभाग आवश्यक असतो. कोल्हापूर समृद्ध शहर आहे. आता आपल्याला घेण्याची नाही तर समाजाला काही देण्याची सवय लावून घेतली पाहीजे. ईश्वर भक्तीत आमच्या भावना गुंतल्या आहेत त्यादृष्टीने साकारलेली ही सुवर्णपालखी म्हणजे देवीला वाहिलेली श्रद्धा आहे. खासदार धनंजय महाडीक यांनी प्रास्ताविकात सुवर्णपालखी साकारण्यामागील भूमिक विषद केली. व लोकसहभागातून महाराष्ट्रातील एखाद्या देवस्थानसाठी साकारण्यात आलेली ही पहिली सुवर्णपालखी असून त्यामुळे पर्यटनवृद्धी होईल असे नमूद केले. शाहू छत्रपती यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
---------------
नवरात्रौत्सवाचा अनुभव
या सोहळ््यानिमित्त अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसराला मिळालेल्या झगमटागाने भाविकांचे डोळे दिपून जात होते. या मंगलमयी वातावरणाने आणि भाविकांच्या अलोट गर्दीने नवरात्रौत्सवाची आठवण झाली. हा सोहळा संपल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
https://www.dailymotion.com/video/x844wmi