ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि.06 - शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. कामाक्ष राक्षसाच्या वधानंतर आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी लव्याजम्यानिशी अंबाबाई त्र्यंबोली टेकडीवर जाते अशी या पूजामागील आख्यायिका आहे. यानिमित्त त्र्यंबोली टेकडीवर अंबाबाई व त्र्यंबोली देवी या सखींची भेट घडवण्यात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मयुरी संतोष गुवर या कुमारिकेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर कुष्मांड भेदन विधी झाला.
शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी व श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पूत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा व दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग हबोता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा यांगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल व जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेवून कामाक्ष मुक्तिमंडपात आला येथे देवगणांसहित अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदर करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ््या मेंढ्यात रुपांतर केले. तेंव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेवून कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेवून त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. यावर रुसुन त्र्यंबोली देवी शहराबाहेरच्या टेकडीवर जावून बसली. ही बाब लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. व त्र्यंबोली देवीच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे. ही पूजा दिवाकर ठाणेकर मिलींद दिवाण, प्रसाद ठाणेकर यांनी बांधली.
या त्र्यंबोली यात्रेनिमित्त सकाळी १० वाजता अंबाबाईचे धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई तसेच जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानीदेवी, छत्रपती शिवाजी महाराज व गुरुमहाराजांच्या पालख्यांनी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान केले. दुपारी पावणे एक वाजता युवराज संभाजीराजे व यशराजे यांच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारी मयुरी संतोष गुरव हीचे पूजन करण्यात आले. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा भेदन विधी झाला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. दुपारी ४ नंतर अंबाबाईची पालखी पून्हा मंदिरात आली.