- ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. 7 - पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांवरील हल्ले थांबवण्यासाठी सरकार कडक पावले उचलेल अशी अपेक्षा होती. निदान त्यामुळे तरी पोलिसांवर हल्ले थांबतील असं वाटत असताना पुन्हा एकदा खाकीवर हात टाकल्याची घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिसगाव नाका परिसरात ही घटना घडली आहे. दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुरु असताना रात्री 9 ते 10 दरम्यान हा प्रकार घडला आहे.
पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांना बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरीमरी मंडळाच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसच असुरक्षित आहेत का काय ? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान पोलिसांवर होणा-या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर काही दिवसानंतरच एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर तरुणाने बाईक घातल्याची घटना समोर आली होती. एका महिला कॉन्स्टेबलला महिलेनेच केलेली मारहाण आणि लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांने पोलिसाला केलेली अडवणूक या अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत.