धनंजय वाखारे,
नाशिक, दि. 1 - तुमच्या वाढदिवशी शुभेच्छांचा पहिला फोन सकाळी-सकाळी खणखणतो आणि ग्रंथदेणगीचा शब्द घेऊनच तो थांबतो. ग्रंथचळवळीला एक नवा आयाम देणारा आणि मायमराठीचा चोहोदूर प्रसार करणारा अवलिया विनायक रानडे यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून अथक परिश्रमातून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची घोडदौड सुरू ठेवली आहे. प्रारंभी मित्र-आप्त नातेवाइकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती पार सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचली आहे. आजवर लोकसहभागातून रानडे यांनी दीड कोटी रुपयांची एक लक्ष ग्रंथसंपदा जमा करत ती वाचकांच्या दारी नेऊन पोहोचविली आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त असलेल्या विनायक रानडे यांनी २००९ मध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. लोकांना ग्रंथभेटीसाठी प्रवृत्त करत रानडे यांनी उपक्रमाची वाटचाल सुरू केली. शंभर पुस्तकांची एक पेटी तयार करत ती सुुरुवातीला नाशिकमध्येच विविध महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांपर्यंत नेऊन पोहोचविली. उपक्रमाला वाढता प्रतिसाद बघता रानडे यांचाही हुरूप वाढत गेला आणि म्हणता म्हणता आजच्या घडीला दीड कोटी रुपयांची एक लक्ष ग्रंथसंपदा त्यांनी अपार कष्टातून उभी केली आहे. रानडे यांनी आतापर्यंत १२५० ग्रंथपेट्या तयार केल्या असून, त्या नाशिकसह अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, वाई, सातारा, कराड, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, जळगाव, धुळे, कोकण, नवी मुंबई, मुंबई, बडोदा, गोवा, सिल्वासा, बेळगाव इथपासून ते दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. एवढेच नव्हे तर ही ग्रंथचळवळ सातासमुद्रापलीकडेही घेऊन जाण्याची जिद्द रानडे यांनी बाळगली आणि दुबई, टोकिओ, नेदरलॅँड, स्वीत्झर्लंड, अॅटलांटा आणि आॅस्ट्रेलिया या देशांतील मराठी माणसांनाही ग्रंथपेटीने आकर्षित केले.
रानडे इथवरच थांबलेले नाहीत तर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा आदिवासी भागातील पाड्यांवरही ग्रंथपेट्या वाचकांची ज्ञानलालसा भागवित आहेत. नाशिकसह ठाणे, पुणे, नागपूर, मुंबई येथील कारागृहातील बंदिवानांनाही ज्ञान वाटण्याचे काम रानडे करत आहेत. विविध हॉस्पिटल्समध्येही नुकतीच या उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे सव्वा लक्ष ग्रंथसंपदा जमवताना रानडे यांनी केवळ मायमराठीचीच निवड केली आहे. त्यात असंख्य अनुवादीत पुस्तकांचाही समावेश आहे. लहान वयातच मुलांना वाचनाची आवड लागावी यासाठी बालवाचकांकरिता सुमारे २५० ग्रंथपेट्या तयार करण्यात आल्या आहेत. या ग्रंथपेट्यांमध्ये आजच्या तरुण पिढीची गरज लक्षात घेता मराठीबरोबरच इंग्रजी पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे. अतिशय नि:स्वार्थ भावनेने ग्रंथचळवळ राबविणाऱ्या रानडे यांच्या या उपक्रमाची प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना दखल घेतली होती आणि खास प्रशस्तिपत्रक पाठवून गौरविले होते. ग्रंथचळवळीतील या अवलियावर दुर्दैवाने मात्र साहित्य संमेलनांवर लाखोंची माया उधळणाऱ्या ना शासनाची नजर पडली ना बड्या संस्थांची. नाशिकचे हे ग्रंथभूषण मात्र अटकेपार मायमराठीचा झेंडा रोवून आले आहे. स्वत:च्या खिशातून टोलप्रत्येक ग्रंथपेटी ही शंभर ग्रंथांची आहे. अशा १२५० पेट्या आहेत. महिला-ज्येष्ठ नागरिक अथवा संस्था यांना दर चार महिन्यांनी एक ग्रंथपेटी पाठविली जाते. प्रत्येक पेटीत नव्या आणि जुन्या पुस्तकांचा समावेश असतो. दर चार महिन्यांनी ग्रंथपेटी इकडून तिकडे फिरत असते. त्यासाठी वाहतूक खर्चही येत असतो. रानडे यांनी बऱ्याचदा स्वत: या ग्रंथपेट्या आपल्या वाहनांतून नेऊन पोहोचविल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी टोल भरण्यातच दीड ते दोन लाख रुपये खर्च केले आहेत. शासनाने त्यांना ग्रंथपेट्यांसाठी किमान टोल माफ केला तरी शासनाकडून ग्रंथसेवा घडली जाईल. कोणत्याही शासन अनुदानाविना राबविलेला हा उपक्रम सर्वदूर जाऊन पोहोचला आहे आणि दिवसागणिक या उपक्रमाला वाचकांची साथही लाभते आहे.